उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (१२ डिसेंबर) विधान परिषदेत केलेल्या वक्तव्यावरून सभागृहाबाहेर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. “पीएचडी करून विद्यार्थी दिवे लावणार आहेत का?” असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षातील नेत्यांनी समाचार घेतला आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांचं वक्तव्य खेदजनक आणि तितकंच संतापजनक असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. त्यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत ही प्रतिक्रिया दिली.
“जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करताना, मंत्र्यांच्या दालनावर शेकडो कोटी रुपये खर्च करताना सरकारला निधीचा अपव्यय वाटत नाही. पण बहुजन समाजातील मुलांनी उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागितली तर तो खर्च मात्र नकोसा का वाटतो?” असा सवाल मनसेनं सोशल मीडिया पोस्टद्वारे विचारला आहे.
मनसेनं पोस्टमध्ये पुढे म्हटलं, “जाहिरातबाजी, मंत्र्यांची आलिशान दालनं, गाड्या, बंगले यावर वायफळ खर्च करताना सरकारकडे निधी असतो. मात्र सारथी, महाज्योती, बार्टी अशा संस्थांमधून बहुजन समाजाची मुलं उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागत असतील. तर उप-उपमुख्यमंत्री म्हणणार ‘पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत?” हे खेदजनक आणि तितकंच संतापजनक आहे
जाहिरातबाजी, मंत्र्यांची आलिशान दालनं, गाड्या, बंगले ह्यावर वायफळ खर्च करताना सरकारकडे निधी असतो मात्र सारथी, महाज्योती, बार्टी अशा संस्थांमधून बहुजन समाजाची मुलं उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागत असतील तर उप-उपमुख्यमंत्री म्हणणार 'पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत?"#खेदजनक आणि… pic.twitter.com/7nA05uig31
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 13, 2023
काय म्हणाले होते अजित पवार?
मंगळवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा संवाद झाला. सारखी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपबाबबत सतेज पाटलांनी सरकारला विचारणा केली. त्यावर “फेलोशिप घेऊन विद्यार्थी काय करणार आहेत?” असा प्रश्न अजित पवारांनी केला. त्यावर सतेज पाटील यांनी “हे विद्यार्थी पीएचडी करतील”, असं उत्तर दिलं. यावर बोलताना अजित पवारांनी “पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत? या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससीसह आयएएस, आयपीएस, आयआरएस अशा इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करायला हवेत”, असं अजित पवार म्हणाले.