तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाचा वापर करुन मंत्रालयात बोगस लिपीक भरती होतं असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे . दरम्यान, या बोगस रॅकेट चालवल्याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात एका मंत्रालयातील कर्मचाऱ्यासह निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतकर या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या यशवंत कदम यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
या प्रकरणातील आरोपीचा माझ्या कार्यालयाशी कसलाही संबंध नसून, बोगस भरती प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असं धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे .
काय आहे सविस्तर प्रकरण ?
संबंधित कर्मचारी हा सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात शिपाई असल्याचे भासवत धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून, एका आदेशाचे बनावट पत्र देत मंत्रालयातील कर्मचारी लिपिक भरतीचे रॅकेट चालवत होता. दरम्यान पालिकेतून सेवानिवृत्त झालेले यशवंत कदम हे आपली पत्नी व दोन मुलांसह गोवंडी परिसरात राहतात. त्यांच्या लहान मुलाचे एम.एस.सी झालेले असून तो नोकरीच्या शोधात होता
याच काळात त्यांचा लहान मुलगा रत्नजीत कदम यांने व्हॉट्स ॲपवर सरकारी नोकरी संदर्भातील जाहिरात बघून निखिल माळवे याच्याशी संपर्क साधला असता माळवे याने त्याला थेट मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात लिपीक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. आणि मुलाखतीसाठी सुरुवातीला ३० हजार रुपयाची मागणी केली . व कायम स्वरूपी नोकरी लावून देण्यासाठी सात लाख अशी एकूण ७लाख ३० हजार रुपयाची मागणी केली. कदम यांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवून पैश्याची तरतूद केली व हे पैसे माळवेला दिले. त्यानंतर कदम यांच्या मुलाला एक बनावट नियुक्तीपत्र देखील देण्यात आले. त्यामुळे ठरलेल्या तारखेनुसार, कदम यांचा मुलगा मंत्रालयात गेला, असता त्याला आज,उद्या करत चालढकल करण्यात आली. त्यामुळे आपल्या मुलाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कदम यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.