धक्कादायक! वाढदिवसाच्या दिवशीच नऊ वर्षीय वैष्णवीचा करुण अंत

तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। मुक्ताईनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाढदिवसाच्या दिवशी कुलरचा शॉक बसल्याने नऊ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. चिमुरडीच्या अकाली निधनानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वैष्णवी चेतन सनान्से असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर शहरातील जिजाऊ नगरात चेतन सनान्से यांची मुलगी वैष्णवीचा शुक्रवारी वाढदिवस होता. शाळेला सु्ट्टी असल्याने वैष्णवी मलकापूर येथे तिच्या मावशीकडे गेली होती. शुक्रवारी वैष्णवीचा वाढदिवस होता यानिमित्ताने तिला शुक्रवारी मुक्ताईनगर येथे तिच्या घरी आणण्यात आले होते. वैष्णवीच्या वाढदिवसामुळे घरी आनंदाचे वातावरण होते. तिच्यासाठी केक, नवीन कपडे आणण्यात आले होते. सायंकाळी घर अगदीच पाहुणे मंडळींनी भरून गेलं होतं.

शेवटी केक कापण्याच्या निमित्ताने सगळे एकत्र आले, यावेळी वैष्णवी तयारी करून बसलेली होती. याचवेळी तिला कुलरचा तीव्र झटका बसला आणि त्यामुळे ती बेशुद्ध झाली. काही वेळात कुटुंबीयांनी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.