तरुण भारत लाईव्ह ।३१ मार्च २०२३। नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नागपूरच्या पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानिक छोटा गोवा नामक तलावात राम नवमीच्या दिवशी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी 30 मार्च रोजी घडली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पारशिवनी येथील छोटा गोवा समजण्यात येणाऱ्या तलावावर दोन्ही तरुण हे दुचाकीने (क्रमांक एम.एच.31 बीएन 5097) फिरायला गेले होते. तेव्हा तलावात कोणीही नाही हे पाहून तलावाजवळ गेले आणि तलावाकाठी असलेली तुटलेली लाकडी बोट घेऊन ते तलावातील पाण्यात शिरले. पाण्यात काही अंतरावर गेले असताच बोटीमध्ये पाणी शिरायला लागले. त्यामुळे बोट पाण्यात बुडू लागली. पोहता येत नसल्याने दोन्ही तरुणांचा बुडून मृत्यू झाला. भवानी नेमीचंद जांगीड (वय 22 वर्षे) आणि पंकज ईश्वरचंद जांगीड (दोघेही रा.चंदन नगर, महेश कॉलनी व हनुमान नगर नागपूर) अशी मृतांची नावं आहेत.
मच्छिमार जेव्हा सायंकाळी पाच वाजता तलावाची पाहणी करण्यासाठी गेले असता दोघांचे कपडे, बूट आणि मोबाईल फोन बाहेर काठावर दिसले. एकाचे डोकं पाण्यात तरंगत असताना दिसले. त्यामुळे कोणीतरी बुडले असल्याचा अंदाज येताच, याबाबत पारशिवनी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आलं. ते तरुण मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनीच्या ग्रामीण रुग्णालय इथे दाखल करण्यात आले.