Video: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम कसे सुरु आहे, पहा व्हिडिओ

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत भगवान श्रीराम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोशल मीडियावर एक ताजा व्हिडिओ शेअर करुन मंदिराच्या कामाची माहिती दिली. या व्हिडीओमध्ये शिल्पकार आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने दगडांवर देवांच्या मूर्ती कोरताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रामजन्मभूमी अयोध्येतील राम मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाल्याने पहिल्या मजल्यावरील काम वेगाने सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय वेळोवेळी राम मंदिराशी संबंधित माहिती, फोटो-व्हिडिओ शेअर करत असतात. आता त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राम मंदिराचे बांधकाम पाहता येईल. व्हिडिओमध्ये मोठ्या क्रेनच्या साह्याने मंदिरात वेगाने बांधकाम सुरू असल्याचे दिसत आहे. शिल्पकार दगडांवर कोरीव काम करतानाही दिसत आहेत.

यापूर्वी चंपत राय यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राम मंदिराची छायाचित्रे आणि मंदिराच्या उत्खननादरम्यान सापडलेले प्राचीन मंदिराचे अवशेषही शेअर केले होते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये उत्खननादरम्यान सापडलेल्या प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात. यात दगडी कोरीव शिल्पे, खांब, दगड आणि देवी-देवतांच्या मूर्त्यांचा समावेश आहे. हे अवशेष राम मंदिर परिसरामध्ये भाविकांना पाहण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.