जळगाव : जिल्ह्यात सप्ताहाच्या सुरूवातीपासूनच तापमान किमान ३० ते कमाल ३६ अंशाच्या दरम्यान आहे. जिल्हावासियांना दिवसा ३४ ते ३६ अंश तापमानासह उष्णतेला सामोर जावे लागत असून गुरूवार सकाळी पहाटेच्या सुमारास जिल्हा परिसरात धुकेयुक्त वातावरण पहावयास मिळाले. धुकेयुक्त वातावरण हे मान्सून परतीचे संकेत असले तरी मात्र, शहर व तालुका परिसरात प्रदूषणाने डोके वर काढले असून भरधाव वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट दिसून येत आहे.
कडक उन्हासह संमिश्र वातावरण
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर मान्सून दरम्यान जळगाव शहरासह सर्वच तालुका परिसरात आतापर्यंत सरासरी १२५ टक्के पर्जन्यमान झाले आहे. दमदार व सरासरीपेक्षा वरचढ पर्जन्यमानामुळे शेतशिवारात पाणी साचलेले असून नदी नाले ओहोळ बऱ्यापैकी प्रवाहीत झाले आहेत. परंतु जळगाव शहरात मात्र पावसाने काढता घेताच टॉवर ते नेहरू पुतळा, गोविंदा रिक्षा स्टॉप चौक, चित्रा चौकासह नेरी नाका वा अन्य परिसरात दुपारच्या वेळी धुळीच्या कणांचे साम्राज्य होते. तर अशीच परिस्थिती काही तालुक्यात होती. बुधवारी दुपार पर्यंत जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण व नंतर कडक ऊन असे वातावरण होते.
धुलिकण एका जागी स्थिर
पाऊस पडतो त्यावेळी प्रदूषण पसरवारे घटक पावसाच्या पाण्यासोबत पाण्यात वाहून जातात. मात्र आता पावसाने विश्रांती घेतली असून आकाश निरभ्र आणि तापमान ३४ ते ३५ अंशादरम्यान आहे. वारादेखील थांबला असून हवेतील आर्द्रतेत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे वातावरणामध्ये असलेले हे सगळे धुलिकण एका जागी स्थिर असल्याने जळगाव शहर परिसर व जिल्हा पहाटेच्या वेळी प्रदूषणात हरवल्याचे दिसून येत आहे असे हवामान अभ्यासकांनी ‘तरूण भारत लाईव्ह’शी बोलताना सांगितले.
ध्वनी आणि वायू प्रदूषणासंदर्भात उपाययोजना करा
शहरातील ध्वनी आणि वायू प्रदूषणासंदर्भात महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम वा आरोग्या प्रशासनाने सर्वसामान्यांना माहिती देणारी यंत्रणा उभी करावी किंवा लहान मुले, महिला, रुग्ण यांना त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
व्हायरल इन्फेक्शनमुळे आरोग्याच्या वाढत्या तक्रारी
पावसाळा संपल्यानंतर शहरातल्या प्रदूषणामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. इमारती आणि रस्त्यांच्या कामांमुळे होणारी धूळ, वाहनातून निघणारा धूर यांच्या मिश्रणाने धुके तयार होते. या धुक्याचा त्रास जळगाव जिल्हावासियांना होतो. गणेशोत्सवादरम्यान, नेहरू चौक परिसरात सादर करण्यात आलेल्या मंदिराचा देखावाच्या कापडी भिंतींवर धुळीचा थर दिसून आला असून सद्यस्थितीत या धुळीच्या वा वायु प्रदूषणामुळे सर्दी पडसे खोकला आदी व्हायरल इन्फेक्शनसारखय मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्याचे दिसून येत आहे.