शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले; मध्यरात्री मंडपातून गायब, प्रशासनात खळबळ

जळगाव : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली नसल्याने ही मदत मिळण्यासाठी उपोषणाला बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मंडपातून गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे या परिसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली नसल्याने ही मदत मिळण्यासाठी मागच्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले होते. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने उपोषण मंडपातील विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यानंतर ते आता गायब झाल्यामुळे त्यांच्या पत्नी वंदना डिक्कर यांना अश्रू अनावर झाल्या आहेत.

परिसरातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. मागच्या १५ वर्षांपासून ते शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. पण रात्री ४ वाजल्यापासून ते गायब आहेत. त्यामुळे मी आता पोलिस स्टेशनला जात आहे. दोन दिवसांपासून त्यांचा फोन लागलेला नाही. शेवटचा फोन केला होता त्यावेळी त्यांची तब्येत चांगली असल्याचं सांगितलं होतं.” असं म्हणत त्या भावूक झाल्या होत्या.