नागपूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दीशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. दीशा सालियान मृत्यू प्रकरणी ज्याच्या कुठल्याही प्रकारची माहिती असेल त्याने ती पोलिसांकडे सादर करावी, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली होती.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार वाद पाहायला मिळत आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या विधानसभेत ठाकरे गटानं गदारोळ केला. शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य करताच आता राज्यात विधान परिषदेत ठाकरे गटाकडून शेवाळेंच्याच एसआयटी चौकशीची मागणी केली गेली आहे. शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी आमदार मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेत केली. उपसभापती नीलम गोर्हे यांनी कायंदे यांची मागणी मान्य करत एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.
याचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. दिशा सॅलियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. यावेळी विरोधकांना बोलू दिलं जात नाही, असं म्हणत विरोधीपक्षातील आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. त्यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावलं. यावेळी जयंत पाटील यांच्याकडून अध्यक्षांना उद्देशून असंविधानिक शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे.