आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये चप्पलफेक, मराठा आंदोलक आक्रमक, नेमकं काय घडलं?

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आज इंदापूर दौऱ्यावर होते. ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर, रासप नेते महादेव जानकर व त्यांच्यासह राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. मात्र, सभा संपल्यानंतर आमदार पडळकर हे इंदापुरातील एका आंदोलन स्थळाला भेट देण्यासाठी गेले असता. शेजारीच मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठीचे साखळी उपोषण सुरू होते. याच दरम्यान पडळकर तिथे आल्यावरून मराठा बांधवांकडून पडळकर यांना जाब विचारण्यात आला. त्याच दरम्यान मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि हे सुरु असताना त्यांच्या दिशेनं चप्पल फेकण्यात आली, अशी माहिती आहे. 

सदर प्रकारानंतर पडळकर हे घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान, मराठा आंदोलकांकडून पडकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. इंदापुरात ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यानंतर ओबीसी आरक्षण याच्यावर एल्गार मेळाव्यानंतर धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना मराठा बांधवाकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती आहे.

इंदापूरमध्ये गेल्या ४७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणा शेजारीच दुधाला दरवाढ मिळण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी गोपीचंद पडळकर सभा संपल्यानंतर जात होते. या दरम्यान मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पडळकर गो बॅक अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पडळकर यांना धक्काबुक्की करत त्यांच्या अंगावर चपला फेकल्याचा देखील प्रकार घडला आहे.