तरुण भारत लाईव्ह जळगाव :स्वत:चं मूल गतिमंद झाल्यानंतर त्यासाठी किती खस्ता खाव्या लागतात, हे लक्षात आलं आणि त्यातूनच गतिमंद आणि विशेष मुलांसाठी काम करणारी संस्था ‘उडाण’ जन्माला आली. याच ‘उडाण’ने आज अनेकांना स्वयंरोजगार दिला आहे. ‘उडाण’च्या 70 उत्पादनांमधून अनेकांच्या हाताला काम मिळालं आहे. अशा या उडाणसाठी काम करणार्या जळगाव येथील हर्षाली प्रवीण चौधरी आज महिलांसाठी आदर्श ठरल्या आहेत.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संपर्क साधला असता, त्या बोलत होत्या.
फूड टेक्नॉलॉजी तसेच हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केलेल्या हर्षाली चौधरी उत्कृष्ट शेफ आहेत. अनेक मराठी टीव्ही रेसिपीमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून अनेक चॅनलवर शो केले आहेत. त्यांचा मुलगा रुशील याला वयाच्या सातव्या वर्षी काही वैद्यकीय अडचणी आल्या आणि नंतर साधारण एका वर्षाने तो त्यातून बाहेर आला पण डॉक्टर आणि तज्ज्ञांनी जाहीर केले की, हे विशेष मूल आहे. रुशीलची बौद्धिक समज कमीच राहील. त्याच्या मेंदूला इन्फेक्शन झाले असून तो एक स्पेशल चाईल्ड आहे. रुशीलची काही प्रगती व्हावी म्हणून आम्ही अनेक डॉक्टर्स, हॉस्पिटल, स्पेशल कोर्सस, वेगवेगळ्या थेरपी अगदी बॉर्नम्यॅरो, स्टेमसेल्स थेरीपी इ. सर्व केले. यात एका गतिमंद पालकांची होणारी धावपळ आणि त्यांना येणार्या अडचणी हर्षाली चौधरी यांनी अगदीच जवळून बघितल्या. त्यातून ग्रामीण भागातील पालकांना या स्पेशल मुलं सर्वच बाबतीत दुर्लक्षित केले जाते, त्यांना जीवन नकोसे वाटते, असे त्यांच्या लक्षात आले. हे सर्व उपचार मोठ्या शहरातच आहेत आणि अतिशय महाग आहेत. सर्वांनाच करणे शक्य नाही. तेव्हा गतिमंदांची व्यथा, पालकांना येणार्या अडचणी बघता हर्षाली आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने दिव्यांग मुलांना या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी काही दिव्यांगाच्या पालकांना सोबत घेऊन स्वखर्चाने रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित ‘उडाण’ची निर्मिती केली. आज रोजी उडाण दिव्यांग अर्ली इंटर्व्हशन सेंटरमध्ये शून्य ते सहा वयोगटातील 35 मुले-मुली, तर उद्योग प्रशिक्षण केंद्रात 50 मुलं-मुली प्रशिक्षण घेतात तर 20 मुलं त्यांचे स्वतःचे उडाण दिव्यांगाचे 2 बचतगट आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणे, गतिमंदांचा सामाजिक, बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे हाच उडाण दिव्यांगाचा उद्देश आहे.
‘उडाण’ गतिमंदांसाठी ठरले मोठा आधार
उडाण अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करून दिव्यांगाना व्यासपीठ देते. तसेच चॉकलेट, बुके, अगरबत्ती, कंदील, तोरण, पतंग, दिवे अशी साधारण 70 उत्पादने ‘उडाण’मध्ये तयार होतात. त्यातून या विशेष मुलांना रोजगार तसेच दिव्यांगांना स्पीच थेरपी, रीमिडीयल, फीजिओ, स्पेशल एज्युकेशन अशा विविध ट्रिेंटमेंट दिल्या जातात. यासाठी अनेक डॉक्टर्स ‘उडाण’ला जोडले गेले आहेत. त्याशिवाय उडाण दिव्यांग साह्यता केंद्रात गतिमंदांच्या कुठल्याही अडचणीवर मदत केली जाते. आज रोजी रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित उडाण अर्ली इंटर्व्हशन, उडाण दिव्यांग डे केअर सेंटर, उडाण कौशल्य विकास केंद्र, उडाण दिव्यांग मदत सहायता केंद्र, उडाण दिव्यांग बचत गट, उडाण दिव्यांग उद्योग केंद्र असे सहा युनिट सुरू आहेत. उडाण गतिमंदांचे स्वत:चे विद्यापीठच आहे. आज रोजी उडाण हे गतिमंदांसाठी खूप मोठा आधार बनले आहे.