ऐकावे तर नवलच! आता गायींसाठी स्मार्टवॉच

तरुण भारत लाईव्ह : गॅझेट्समध्ये सर्वात लोकप्रिय म्हणजे स्मार्टवॉच. गत वर्षभरात स्मार्टवॉचची विक्री झपाट्याने वाढली आहे. नवनवीन फिचर्ससोबत शरिराशी निगडीत माहिती याव्दारे उपलब्ध होत असल्याने अनेकांची स्मार्टवॉचला प्रथम पसंती असते. मात्र या स्मार्टवॉच केवळ मानवासाठीच असतात असा प्रश्‍न जर तुम्हाला पडला असाल तर तुमचा अंदाच चुकीचा आहे. कारण आता चक्क गायींसाठी स्मार्टवॉच तयार करण्यात आल्या असून त्या लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत.

गायींसाठी तयार करण्यात आलेल्या या स्मार्टवॉचद्वारे गायींची दैनंदिन जीवन, प्रजनन चक्र, त्यांना होणारे आजार, दूधाचे उत्पादन इत्यादींवर देखरेख ठेवता येणार आहे. यातून गायींची प्रकृती सुधारणे आणि प्रजनन करविण्यात मदत मिळेल. याचबरोबर गायींच्या आसपासच्या वातावरणाची स्थितीही ट्रक करता येणार आहे. यात ऑक्सिजन पातळी, तापमान, हवेतील आर्द्रता आदींचा समावेश असेल. चीनच्या साउथवेस्ट जियाओतोंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी पशूंची प्रकृती, प्रजनन आणि ठिकाण ट्रक करण्यासाठी ही स्मार्टवॉच विकसित केली आहे.

स्मार्टवॉच गायीच्या मानेत किंवा पायांमध्ये घातले जाऊ शकते. यामुळे गायींची अत्यंत लहान हालचालही ट्रक करण्यास मदत होणार आहे. या स्मार्टवॉचमध्ये लिथियम बॅटरीचा वापर होणार असल्याने गायींच्या हालचालींतून निघणारी ऊर्जा बॅटरीत जमा होत हे उपकरण संचालित होत राहणार आहे. म्हणजेच पारंपरिक वॉचप्रमाणे याला वारंवार चार्ज करण्याची गरज भासणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या स्मार्टवॉचचे गायींपूर्वी माणसांवर परीक्षण करण्यात आले आहे.