जळगाव : तालुक्यातील बोरनार येथे सर्पदंश झाल्याने ४७ वर्षीय शेतमजूराचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय हिरामण पाटील (४७) असे मयत शेतमजूराचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील बोरनार गावात संजय पाटील हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेतमजूरी व शेळीपालनाचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवार, ९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता ते बकऱ्यांना चारा घेण्यासाठी गावाजवळील शेतात गेले. झुडूपाजवळ चारा तोडत असताना त्यांना संर्पदंश झाला. त्यांना गावातील ग्रामस्थांनी तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.