अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस (George Soros) यांच्या अनावश्यक तसेच आगलाव्या विधानांमुळे भारतातील राजकीय वातावरण तापले आहे. भारताविरुद्ध गरळ ओकण्याच्या त्यांच्या या फुटीरतावादी मानसिकतेवर सर्वस्तरांवरून टीकेचा भडिमार सुरू आहे.
आपल्या विधानातून सोरोस यांनी भारतातील अंतर्गत कारभारात नाक खुपसण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. सोरोस यांनी हिंडेनबर्ग अहवाल तसेच अदानी समूहाच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करताना एकप्रकारे त्यांच्या सरकारच्या पतनाची शंका व्यक्त केली होती. त्यामुळे या मुद्यावरून याआधी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सोरोस यांच्यावर हल्ला चढवला. भारतातील लोकशाही कमजोर करण्याचे कारस्थान परदेशातील भूमीवरून रचले जात असल्याचा घणाघाती हल्ला इराणी यांनी चढवला. आता परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असताना सोरोस यांची कानउघाडणी केली. सोरोस हे पूर्वग्रहदूषित तसेच धोकादायक असे व्यक्ती असून आपल्या म्हणण्यानुसार जग चालले पाहिजे, असा त्यांचा अवाजवी अट्टाहास असतो, असे जयशंकर म्हणाले. सोरोस यांनी भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याच्या आधी अमेरिकेत काय सुरू आहे, ते पाहिले असते तर त्यांनी असे बोलण्याची हिंमत केली नसती. लोकांच्या डोळ्यातील कुसळ दिसते, मात्र आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशी एक म्हण आहे; ती (George Soros) सोरोस यांना लागू होते.
मुळात भारतात ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत, त्यावर मतप्रदर्शन करण्याचा सोरोस यांना कोणताही अधिकार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबाबत भारतातील कोणा उद्योगपतीने असेच विधान केले असते, तर ते अमेरिकेच्या सरकारने तसेच तेथील जनतेने खपवून घेतले असते का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. त्यामुळे सोरोस यांना भारताच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसण्याचा अधिकार कोणी दिला, अशी जर भारतीय जनतेची भावना असेल तर ती चूक कशी म्हणता येईल. सोरोस यांनी हिंडेनबर्ग अहवाल आणि अदानी समूह या मुद्यावरून नाकाने कांदे सोलण्याची भूमिका घेतली असली, तरी त्यांनी याआधी आपल्या पायाखाली काय जळत आहे, ते पाहायला पाहिजे. बँक ऑफ इंग्लंड बुडवण्याचे शिल्पकार म्हणून (George Soros) सोरोस यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे हिंडेनबर्ग अहवालावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार सोरोस यांना नाही. तुम्ही ज्यावेळी एक बोट लोकांच्या दिशेने उचलता त्यावेळी तुमचीच उर्वरित चारही बोटे तुमच्याच दिशेने रोखली गेलेली असतात, हे विसरण्याचे कारण नाही. सोरोससारख्यांनी तर याचा स्वत:ला मुळीच विसर पडू देऊ नये. सोरोस यांनी याआधी अनेक देशांत आपले नाक खुपसण्याचा प्रयत्न केला. 1997 मध्ये थायलंडमध्ये जे आर्थिक संकट निर्माण झाले, त्यालाही सोरोस जबाबदार होते, असे म्हणतात. मलेशियाचे तत्कालीन पंतप्रधान महातिर बिन मोहम्मद यांनीही रिगिंटच्या पतनाचा ठपका सोरोस यांच्यावर ठेवला होता.
मुळात भारताच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसण्याचा सोरोस यांचा हा पहिलाच प्रयत्न नाही; याआधीही त्यांनी असे प्रयत्न केले होते. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम मोदी सरकारने रद्द करण्याच्या तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्यावरून सोरोस यांनी असाच आगाऊपणा केला होता. जम्मू-काश्मीरवर निर्बंध लादत मोदी तेथील जनतेवर अन्याय करीत आहे, त्यांना शिक्षा देत आहे तसेच लाखो मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व काढण्याची धमकी दिली जात आहे, असे अकलेचे तारे सोरोस यांनी तोडले होते. याचा अर्थ सोरोस यांनी आता केलेले विधान हे अनावधानाने केलेले नाही, तर जाणीवपूर्वक केलेले आहे, असे दिसून येते. अशा विधानांतून त्यांच्या भारतविरोधी मानसिकतेचे दर्शन होते, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. जगातील सर्व शहाणपणाचा ठेका आपल्याचकडे आहे, अशी धारणा सोरोस यांनी करून घेतली आहे. (George Soros) अब्जाधीश असल्यामुळे जगातील सर्व घडामोडींत नाक खुपसण्याचा विशेषाधिकार आपल्याला मिळाला, त्यामुळे आपण कोणत्याही देशाविरोधात गरळ ओकू शकतो, आपल्याला कोणी रोखू शकत नाही, आपले कोणी काही वाईट करू शकत नाही, असा समज त्यांनी करून घेतला आहे. रामायणात लक्ष्मणाने जसे शूर्पणखेचे नाक कापले होते, तसेच सोरोस यांचे नाक कापण्याची वेळ आली आहे, यासाठी आता लक्ष्मणाची भूमिका कोण बजावेल, ते पाहावे लागणार आहे. भारत कोणत्याही देशाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करीत नाही, त्यामुळे कोणी आपल्या देशाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप केला तर भारत आणि भारतातील जनता ते खपवून घेऊ शकत नाही, त्याला जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहात नाही.
हिंडेनबर्गने अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारावर आपला अहवाल जारी करणे तसेच (George Soros) सोरोस यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही, तर हा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा भाग आहे, अशी जी शंका घेतली जात होती, तिला सोरोस यांच्या विधानावरून पाठबळ मिळाले आहे. जॉर्ज सोरोस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक असून मोदींना सत्तेवरून पायउतार करण्याचा संकल्प सोडला आहे, असे एकूणच घटनाक’मावरून दिसून येत आहे. मात्र, कावळ्याच्या शापाने ज्याप्रमाणे गाय मरत नाही, त्याप्रमाणे असे छप्पन सोरोस आले तरी ते मोदी यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. कारण भारतातील कोट्यवधी लोकांच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच मोदी यांच्या पाठीशी आहे. सोरोस यांनी सध्या पंतप्रधान मोदी तसेच भारतविरोधी भूमिका घेतली, तशीच भूमिका त्यांनी 2003 मध्ये (George Soros) अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याविरुद्धही घेतली होती. 2003 मध्ये वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत सोरोस यांनी जॉर्ज बुश यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून हटवणे हे आपल्या जीवनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे म्हटले होते. ही आपल्यासाठी जीवन-मरणाची लढाई असून जो बुश यांना अध्यक्षपदावरून पदच्युत करेल, त्याला आपण आपली संपूर्ण संपत्ती देण्यास तयार असल्याचेही सोरोस यांनी तेव्हा म्हटले होते. बुश यांना पराभूत करण्यासाठीच सोरोस यांनी 2004 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाला मोठ्या प्रमाणात आर्थिक साह्य केले होते. जॉर्ज बुश यांना आपला विरोध का आहे, हेही सोरोस यांनी भाषणातून स्पष्ट केले होते.
9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली असताना सोरोस यांनी अमेरिकेच्या दहशतवादविरोधी भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत आपले खायचे नाही तर दाखवायचे दात दाखवून दिले. 2017 मध्ये सोरोस यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख ‘ठग’ असा केला होता. जगात व्यापार युद्ध (ट्रेड वॉर) सुरू करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही (George Soros) सोरोस यांनी केला होता. यावरून सोरोस यांची लायकी आणि देशविरोधी मानसिकता दिसून येते. जो माणूस आपल्या देशाचा होऊ शकला नाही, तो भारताच्या बाजूने कसा राहील. भारताच्या हिताचा विचार कसा करेल? सोरोस हे एखाद्या विषारी सापासारखे आहे, सापाला तुम्ही कितीही दूध पाजले तरी तो विष ओकण्याचे थांबवत नाही, तशीच स्थिती सोरोस यांची झाली आहे. सोरोस यांनी आपल्या देशाच्या विरोधात, अमेरिकाविरोधी भूमिका घेतली होती, त्यामुळे त्यांनी भारतविरोधी भूमिका घेतली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण सोरोस यांची मानसिकताच देशविरोधी आहे. कोरोनानंतरच्या प्रतिकूल काळात जगाची अर्थव्यवस्था मंदावली असताना भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वेगाने वाटचाल सुरू आहे, हे सोरोससारखे अब्जाधीशांना कसे रुचणार, त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासरूपी दुधाच्या वाटीत मिठाचा खडा टाकण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. सोरोस हे जगातील भारतविरोधी मानसिकतेचे प्रतिनिधी आहेत. सोरोससारख्या लोकांना आपल्या देशातील काही हितशत्रू साथ देत आहेत, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. मात्र, (George Soros) सोरोससारखे कितीही आले आणि गेले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनमानसातील प्रतिमा डागाळू शकत नाही; त्यांची लोकप्रियता कमी होऊ शकत नाही तसेच भारताला विश्वगुरू होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.