Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज सोमवारी ६.०० वाजता थांबला. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनाने निवडणूक जाहीर झाल्यापासून बेकायदेशीर रक्कमसह अंमलीपदार्थ जप्तीची धडक कारवाई केली. यात आतापर्यंत किती कोटींची मालमत्ता जप्त केली आहे, याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज सोमवारी ६.०० वाजता थांबला असला तरी दोन दिवस निवडणूक आयोगाचे पथके आणि पोलीस प्रशासन अधिकच सतर्क असणार आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
सोमवारी नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहे. त्या रुपयांची मोजणी निवडणूक पथकाकडून करण्यात येत होती. ही रक्कम पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत ८० कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर जळगाव आणि नागपूरमध्ये सोने, चांदीचे दागिने जप्त केले होते. हे दागिने सराफ व्यावसायिकांचे होते. परंतु त्यासंदर्भातील कागदपत्रे नसल्यामुळे ते जप्त केले होते.
निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर कारवाई केली आहे. १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.