सोलापूर: काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात केदार दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांना ५ वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर आता त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.सुनील केदार यांच्यावर जी कारवाई घाई गडबडीत झाली,त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने खासदार डॉ जय सिद्धेश्वर महाराज महास्वामी आणि खासदार नवनीत राणावर देखील कारवाई करावी त्यांचे सदस्यत्व ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे. (Tarun Bharat live)
जातीचे दाखले रद्द झालेत आजतागायत कारवाई नाही
२०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवनीत राणा आणि डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी महाराज यांनी राखीव जागेतून निवडणुकीत विजय संपादन केला आहे. काही महिन्यांत दोघांच्याही जातीच्या दाखल्यावर हरकत घेण्यात आली होती.जातपडताळणी समितीने दोन्ही खासदारांचे जातीचे दाखले रद्द केले आहेत, मात्र, आजतागायत यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
दोन्ही खासदारांवर सदस्यत्व रद्दची कारवाई करावी
काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते मनोज उर्फ काकासाहेब कुलकर्णी यांनी भारतीय जनता पार्टीवर आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्यावर ज्या प्रमाणे आमदारकी रद्दची कारवाई झाली. त्याप्रमाणे भाजपच्या या दोन्ही खासदारांवर सदस्यत्व रद्दची कारवाई करावी ,अशी मागणी केली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जयसिद्धेश्वर स्वामी हे काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करुन विजयी झाले होते. तर, अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र, काही दिवसानंतर डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द ठरवलं होतं.