तरुण भारत लाईव्ह । जळगाव : काही लोक लायकी नसताना मुख्यमंत्री बनलेत, काही जुगाड करून मोडून तोडून मुख्यमंत्री बनलेत, असे वक्तव्य उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त पहाणी करण्यासाठी आल्यावर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा आहे, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले. अजित पवार हे विक्रमी काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनाही आता मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा असेल तर त्यात गैर काय, असा सवाल त्यांनी विचारला.
जळगाव दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच्या सभेबद्दल घोषणा करत असताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार विरुद्ध संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धानंतर त्यांनी चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी ते बोलत होते. “अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहेत. त्यांना आता मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा होत असेल तर त्यात काही गैर नाही.”, अशी प्रतिक्रिया उबाठा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “कालपासून आम्ही जळगावात घुसलो आहोत. आम्हाला घुसू देण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे आम्ही आलो. जळगाव आमचं आहे. शिवसेनेचे आहे. उद्धव ठाकरे यांचे जळगावात आगमन होईल, ते पाचोऱ्याला सभेसाठी जाणार आहेत. यासोबत इतरही काही कार्यक्रम आहेत. त्यानंतर सायंकाळी पाचोऱ्यात जाहीर सभा असणार आहे. प्रदीर्घ काळानंतर उद्धव ठाकरेंची ही सभा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. उबाठा गट संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते सभा यशस्वी करण्यासाठी जमलेले आहेत. उद्धव ठाकरे विविध विषय मांडणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री असण्याचा त्यांच्या नावे मुख्यमंत्री झाले आहेत. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करुन तोडफोड करुन मुख्यमंत्री होत असतात. अजितदादांची इच्छा ही प्रथम व्यक्त झालेली नाही. त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.”
जळगावातील शिवसेना ही जागेवरच आहे. तुम्ही कुठल्याही क्षणी निवडणूक घ्या आम्ही ते सिद्ध करुन दाखवू, असे आव्हान त्यांनी गुलाबराव पाटील यांना दिली आहे. काल आमच्या सभेत कुणी उंदीर घुसला आहे का हे देखील आम्ही पहात होतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीतच रहाणार आहेत. त्यांनी पक्षबदलण्याचा प्रश्न येतच नाही. मी कुणाची वकिली करत नाही, मी फक्त महाविकास आघाडीची वकिली करतो, असे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.