---Advertisement---
जळगाव : यावलच्या दहिगाव-विरावली रोडवर एका तरुणाची दोघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना ताजी असतनाच, जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून मुलाने पित्याची हातोड्याने वार करून हत्या केली. राजेंद्र दत्तात्रय कासार (वय ६४) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रानुसार, अमळनेरच्या शिरुड नाका, शिवाजी नगर परिसरात घरगुती वादातून ही धक्कादायक घटना घडली. भूषण कासार हा दारूच्या नशेत असताना वडिलांशी वाद झाला. संतापाच्या भरात त्याने हातोड्याने डोक्यात, पोटावर आणि कंबरेखाली गंभीर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र कासार यांचा जागीच मृत्यू झाला. मृत कासार यांना देखील दारूचे व्यसन असल्याने त्यावरूनच वडील-मुलामध्ये वाद वाढला आणि अखेर खूनाची ही घटना घडली.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घरी कुणीही नसताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खून करून पोलिसात हजर
यावल तालुक्यातील दहिगाव-विरावली रोडवर एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर तोंडावर, जबड्यावर, कंबरेच्या व उजव्या बाजूला वार करून दोघांनी निघृण हत्या केली. या घटनेनंतर दोघे स्वतःहून यावल पोलीस ठाण्यात हजर झाले. ही धक्कादायक घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडल्याने यावल तालुक्यात खळबळ उडाली.