---Advertisement---
जळगाव : कौटुंबिक वादातून पित्याची निघृण हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुसावळ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. हेडावू यांनी शनिवारी हा निकाल दिला.
दिनेश उर्फ शिता अनाज्या बारेला (३६, रा. पाल) असे शिक्षा झालेल्या मुलाचे तर अनाज्या भारत्या बारेला (७५) असे मृत पित्याचे नाव आहे. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पाल शिवारातील शेत गट क्रमांक २७१ मध्ये ही घटना घडली होती. जेवणाच्या वादातून दिनेश याने वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली.
त्यानंतर मुलगी बनाबाईलाही मारहाण झाली. दिनेशने लाकडी खाटेचा माचा घेऊन अनाज्या यांच्या डोक्यावर वार केले. यात अनाज्या बारेला जागीच ठार झाले. दरम्यान, न्यायालयात साक्ष देताना जेव्हा खाटेचा माचा पुरावा म्हणून न्यायालयात आणला गेला, तेव्हा बनाबाई ही तो माचा पाहताच थरथर कापत रडू लागली.
बहिणीची साक्ष ठरली निर्णायक
या प्रकरणात आरोपीची सख्खी बहीण बनाबाई नरसिंग बारेला हिच्यासह १६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे अॅड. मोहन देशपांडे यांनी युक्तिवाद केला. तपासात पैरवी अधिकारी कांतीलाल कोळी, ज्ञानेश्वर चौधरी आणि हेमराज झटके यांनी सरकार्य केले.