गान कोकिळा लतादीदींचा आज प्रथम स्मृतीदिन

लतादिदी  आपल्यातून जाऊन बघता बघता एक वर्ष झालं. आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन पण तरीही त्या आपल्यात नाहीत, यावर मनाचा विश्वासच बसत नाही. त्यांच्या असंख्य गाण्यामधून, त्या आपल्याला रोजच दिवसातून अनेक वेळा भेटत असतात.

तेरे पास आ के, मेरा वक्त गुजर जाता है
दो घडी के लिए, गम जाने किधर जाता है…

हे गाणं १९६५ सालच्या ‘नीलाआकाश’ सिनेमातले ज्याला मदन मोहन यांच्या संगीत आहे आणि ते आशा भोसले-रफी ह्यांनी गायलेलं आहे. हे गाणं यावेळी आठवण्याचं कारण की, ह्या ओळींसारखंच लताबाईंचा आवाज ऐकला की आपलं होतं. त्यासाठी फक्त पहिल्या ओळीत थोडा फरक करावा लागेल.

तेरे सुरोंके साथ, मेरा वक्त गुजर जाता है
दो घडी के लिये गम जाने किधर जाता है

हा अद्वितीय स्वर आपल्याला किती वेगवेगळ्या रूपात भेटला. एखाद्या विरहिणीच्या दु:खद भावनांपासून ते उत्फुल्य नायिकेच्या विभ्रमांची ओळख करून देणार्‍या ह्या स्वरांची जादू, भारतीय मनावर पसरली ती अगदी भारताच्या स्वतंत्र होण्यासोबतच..

भारताच्या स्वातंत्र्यतेला ह्या वर्षी ७५वर्षे पूर्ण झाली आणि भारतीयांना सुध्दा या आवाजाची सवय होऊन ७५ वर्ष झाली.

१९४७ ला ‘आप की सेवा में’ मध्ये मराठी संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या संगीतात लताजींनी तीन गाणी गायली, जी गीतकार महिपाल यांनी लिहीली होती. हे महिपाल म्हणजे तेच, जे पुढे एक नायक म्हणून आपल्यासमोर आले.(सुप्रसिद्ध ’नवरंग’ किंवा ‘पारसमणी’ चित्रपटांत महिपाल हेचं नायक होते.) लताजींचं पहिलं गाणं, ’पा लागू कर जोरी’ हे याच तीन गाण्यांमधलं एक.
जेमतेम अठरा वर्षांच्या नाजूक चणीच्या ह्या मुलीत स्वरांचं एक इंद्रधनू आहे हे सत्य त्या वेळी जितक्या संगीतकारांना उमगलं त्या सर्वांनीच मग ह्या स्वरांना आपापल्या परीने आकार देण्यास सुरुवात केली.

खरं तर ह्या स्वराने १९४५ च्या ’ बडी मॉं’ मधून पडद्यावरून साद घातला होता. त्यात लताने – ‘माता तेरे शरण मे’ हे एकल गीत आणि ‘तुम मा हो बडी मा हो’ हे शीर्षक गीत गायलं होतं(ह्यामध्ये सहगायिका होत्या मीनाक्षी शिरोडकर). त्यावेळी तर ही मुलगी १३/१४ वर्षांची बालिका होती आणि ‘बडी मॉं’ ची नायिका होती… नूरजहान.. ज्यांची खुद्द लता फॅन होती. ‘बडी मॉं’ चे संगीतकार सुध्दा मराठीचं होते.. के. दत्ता.. म्हणजेच दत्ता कोरगांवकर.

१९४८ मध्ये राजकपूर वयाच्या तेविसाव्या वर्षी ’ आग ’ चित्रपट दिग्दर्शित करतात आणि त्याचं वर्षी १७/१८ वर्षांची लता ’पद्मिनी’ चित्रपटात, त्यावेळच्या दिग्गज संगीतकार गुलाम हैदर ह्यांच्या निर्देशनात गाऊन जाते, ’ बेदर्द तेरे दर्द को सीने से लगा के, रो लेंगे तसव्वूर मे तुझे पास बिठाके’ हे विरहगीत..

ह्याचं गुलाम हैदरनीच तर बजावलं होतं, त्यावेळच्या दिग्गज निर्मात्यांना म्हणजेच शशधर मुखर्जी ह्यांना, ‘तुमच्या ‘शहीद’ चित्रपटासाठी हा स्वर तूम्ही नाकारता आहात.. पण लक्षात ठेवा, हाच स्वर पुढचा काळ घडवणार आहे’ . किती खरी ठरली त्यांची ती भविष्य वाणी..

हैदर ह्यांनी मग एका दुसर्‍या चित्रपटात ह्याच १९४८ मध्ये लता कडून गाऊन घेतलं.. तो चित्रपट होता मजबूर.. आणि त्यातली लताजींनी गायलेली गाणी आहेत, ’ दिल मेरा तोडा, मुझे कहीं का न छोडा, तेरे प्यार में’ , ’अब कोई जी के क्या करे, जब कोई आसरा नहीं ’ आणि त्यावेळी खूप गाजलेलं, ’ अब डरने की कोई बात नहीं, अंग्रेजी छोरा चला गया’ .. नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर हे गाणं गाजलं नसतं तरचं नवल..

या आधी बडी मा साठी गायलेली ती लहानगी तीनच वर्षांत इतकी सुंदर गायिका म्हणुन समोर येताच संगीतकार के. दत्ता यांनीही ’मेरी कहानी’
मधून दोन गाणी लता मंगेशकर यांच्या स्वरांत दिली, ’ नन्ही नन्ही बुंदिया जीया लहराए’ आणि ’ दिलवालो दिलो का मेल’

अनिल विश्वास ज्यांना हिंदी चित्रपट संगीताचे ‘पितामह’ मानलं जातं ते कसे मागे राहतील. त्यांनी ‘अनोखा प्यार’ साठी दहा पैकी नऊ गाणी फक्त लता मंगेशकर ह्याचं नव्या गायिकेसाठी राखली. काय एक एक गाणं आहे लताजींचं? नुसता उल्लेख करताच गाणं आपल्या कानांमध्ये गुंजारव करायला लागतं…. ही सगळी गाणी वयाच्या केवळ १९ व्या वर्षी त्यांनी गायलेली आहेत हे मानायला मन तयार होत नाही पण.. वस्तुस्थिती तीच आहे.

सर्वात उत्कृष्ठ गाणं.. ज्याला मास्टर पीस म्हणता येईल ते गाणं आहे.. ‘याद रखना चांद तारों इस सुहानी रात को’ अर्थात बाकीची गाणी सुद्धा सुंदर आहेतचं .. ‘ घड़ी घड़ी पूछो ना.. घड़ी घड़ी पूछो ना जी किनसे मेरी प्रीत है’ ह्यातला लाडिकपणा मोहक आहे. तसाच तो ‘भोला भाला री मोरा बलमा ना जाने, प्रीत की अजब कहानी’ मध्ये पण आहेच. ‘मेरे फूलों मे छिपी’ साठी हा स्वर थोीीडा बोल्ड होतो आणि तोच स्वर दु:ख ओततो- ‘मेरे लिए वो गम ए इंतजार छोड़ गए, गए तो एक अनोखी बहार छोड़ गए’ आणि ‘ इक दिलका लगाना बाकी था’ मध्ये. लताने ह्या चित्रपटात तक्रारीचा सुर छेडला तो, इरा नागरथ ह्या गायिकेच्या सोबतीने(जी संगीतकार रोशन ह्यांची पत्नी राकेश-राजेश रोशन ह्यांची आई आणि रितिक रोशन ह्याची आजी आहे), ते गाणं आहे, ‘ए दिल मेरी वफ़ा मे कोई असर नहीं है’ एक गाणं लता मुकेश ह्यांनी गायलं, ‘अब याद न कर भूल जा ए दिल वो फ़साना, वो प्यार की घड़िया वो मूहोंबबत का जमाना’ आणि एक गाणं जे लता आणि मुकेश दोघांनी वेगवेगळं गायलेलं आहे आणि ते पण सुंदर आहेच. ‘जीवन सपना टूट गया, जानेवाला जाते जाते, दिल की दुनिया लूट गया’. लताजी हेच गाणं सुरुवातीला उंच स्वरांत गायला सुरुवात करतात. त्यांच्या गाण्यात ‘एक मुसाफिर आया आके दिलकी दुनिया लूट गया’ असे शब्द येतात. त्यामुळे एकाच गाण्यातून एकाच चालीमधून, नायक आणि नायिका ह्यांच्या भावना व्यक्त होतात. हे अप्रतिम शब्द रचले होते, गीतकार जिया सरहद्दी ह्यांनी. चित्रपट पाहताना एक गोष्ट लक्षात येते की चित्रपटात बहुतांशी गाण्यांमध्ये गायिका मिना कपूर ह्यांचा स्वर ऐकू येतो (ज्या अनिल विश्वास ह्यांच्या पत्नी झाल्या). म्हणजेच रेकॉर्ड निघाली तेव्हा सगळी गाणी लता मंगेशकर ह्यांच्या स्वरांत निघाली. मला वाटतं- हे जे काही घडलं त्यातून लता मंगेशकर ह्या स्वरांचा प्रभाव नक्कीच लक्षात येईल.

हा प्रभाव ‘गजरे’ ह्या १९४८ मधल्याच दुसर्‍या चित्रपटातून

 

आणखीनचं अधोरेखित होतो. ‘गजरे’ ची नायिका होती सुरैया, जी स्वत:च एक प्रतिभावान आणि सुरेल गायिका होती. त्यामुळे त्या चित्रपटात दुसर्‍या गायिकेचा नंबर लागणं मुश्किल होतं पण अनिलदांनी त्या चित्रपटात सुद्धा एक- दोनचं नाही तर, तब्बल चार गाणी लताला दिली त्यातली दोन अप्रतिम गाणी, ‘कब टक कटेगी जिंदगी, किनारे किनारे’ आणि दुसरं गाणं, ‘कब आओगे बालमा’ असा उंच स्वरांत पुकारा करून सुरू होतं ‘बरस बरस बदली भी बिखर गयी, अब कहॉं छुपोगे बालमा अब कब आओगे’.. काय गातात लताजी.. कितीदा ऐका मन भरतच नाही.. अर्थात हे असं त्यांच्या अनेक अनेक गाण्यांच्या बाबतीत घडतं.

अर्थातच सुरैयाजींची गाणी सुद्धा गाजलीच ती होती, ‘ओ दुपट्टा रंग दे मेरा, रेंग दे, हो गई सरसों पीली पीली’ आणि, ‘दूर पपीहा बोला, रात आधी रह गयी’ ही.
‘आशा’ साठी ग्रेट संगितकार खेमचंद प्रकाश ह्यांनी ‘दूर जाये रे राह मेरी, आज तेरी राह से’ हे गाणं गाऊन घेतलं… ज्यांनी पुढे जाऊन लता मंगेशकर यांच्या साठी ते अजरामर गाणं निर्मित केलं ज्या मुळे लता मंगेशकर हे नाव भारतभर गाजलं… अर्थातच महल मधलं, ’आयेगा आनेवाला’.

‘जिद्दी’ मधून ह्याच खेमचंद प्रकाश ह्यांनी एका महान गायकाला हिन्दी चित्रपट सृष्टिचा प्रकाश दाखवला. त्याच्या आयुष्यातलं पहिलं गाणं त्याने ह्याच ‘जिद्दी’ मध्ये गायलं आणि दुसरं गाणं गायला त्या गायकांबरोबर होत्या लताजी. ती ‘जिद्दी’ मधली दोन गाणी ही, ‘मरने की दुवाए क्या मॉंगू, जीने की तमन्ना कौन करे’ आणि दूसरं, ‘ये कौन आया रे, कर ये सोलह सिंगार, ये कौन आया’. पहिलं एकल गाणं गाणारा तो गायक होता किशोर कुमार, ज्याची ह्या गाण्यातली स्वरांची पट्टी आणि गाण्याची पद्धत आजच्या पिढीला अपरिचित अशी आहे. पण दुसर्‍या गाण्यात मात्र लताजी आणि किशोरजी गातात तेव्हा नंतरच्या किशोरकुमार ची झलक दिसते. ह्या ‘जिद्दी’तच लताजींनी आणखी पाच गाणी गायली, ‘रुठ गए मोर श्याम’, ‘तुझे ओ बेवफा हम जिंदगी का आसरा समझे’, ‘अब कौन सहारा है, जब तेरा सहारा छूट गया’ ‘जादू कर गये, किसीके नैना, की मन मोरा बस मे नहीं’ आणि अतिशय गाजलेलं ‘चंदा रे जा रे जा रे’

‘चूनरिया’ साठी हंसराज बहल ह्या संगीतकाराने ’दिल ए नाशाद को जीने की हसरत हो गई तुमसे’ गाऊन घेतलं.( ह्याच गाण्याची पुढे जाऊन लक्ष्मी-प्यारे नी नक्कल केली आणि ते ही गाणं लताजींनीच गायलेलं आहे) याच चित्रपटांतल्या एका गाण्यात आशा भोसले यांचा स्वर हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथम निनादला होता… हो तेच आशाजींचं पाहिलं गाणं आहे.. ‘सावन आया रे’
संगीतकार प्रेमनाथ हे तसे फार गाजलेले संगीतकार नव्हते पण त्यांना सुध्दा लतास्वर भावला होता आणि त्यांनी सुध्दा एक गाणं आपल्या ‘चांद सितारे’ साठी त्यांच्या कडून गाऊन घेतलं..’ ए दुनिया के मालिक, मुझे तुझसे गीला है ’

के दत्ता आणि दत्ता डावजेकर ह्यांच्या प्रमाणेच आणखी दोन मराठी संगीतकारांनी लताजींकडून गाऊन घेतलं. त्यातले एक होते, मुकुंद मसुरकर ज्यांनी ‘दीदी’ साठी ह्या नंतर संपूर्ण चित्रपट सृष्टीची जी ‘लतादीदी’ झाली तीला इंदिवर ह्यांची रचना दिली, ‘ तेरे नैनो मे निंदिया, निंदिया मे सपने’ ह्या गाण्यात लताजींनी ‘तेरे’ हा शब्द जसा म्हटला आहे, ते खरोखरचं सुंदर..
दुसरे मराठी संगीतकार होते रामकृष्ण शिंदे ज्यांनी बिहारी चित्रपटात लताजींच्या स्वरांत एक उर्दू शब्द असलेलं असं गाणं गौण घेतलं, ‘सब्जे की दुर्फीशानी, फूलों का शामियाना’ गीतकार होते मुंशी फ़रोग.

आणखी एक मराठी संगीतकार जे मराठी आहेत हे सुद्धा त्यावेळी बर्‍याच जणांना माहिती नव्हतं, ते आहेत सी. रामचंद्र.. रामचन्द्र नरहर चितळकर.. त्यांना लता ह्या मुलीला पाहून, म्हणजे तिला ऐकून, तिच्या स्वरांवर विसंबून राहण्याचा काळ येणार आहे ही जाणिव झाली नसेल असं म्हणता येणार नाही पण.. काही पण तसेच सोडावेत हेच बरं. त्यांनी ह्या १९४८ मध्ये काही फुटकळ गाण्यांमध्ये हा स्वर उमटवला पण ती गाणी आणि नंतर झालेला त्या दोघांच्या स्वरांचा उत्सव ह्यांत काहीच साम्य नाही. ह्या वर्षांमध्ये त्यांची मुख्य गायिका म्हणून कोणी एक गायिका नव्हती. शमशाद बेगम, ललिता देऊळकर (म्हणजेच नंतरच्या ललिता फडके, आपल्या सुधीर फडके ह्यांच्या पत्नी), बिना-पानी मुखर्जी, गीता रॉय (नंतरच्या गुरुदत्त च्या पत्नी, गीता दत्त) अश्या अनेक होत्या. त्यामुळे त्यांनी १९४८ मध्ये काही खास गाणी ह्या १९ वर्षांच्या मुलीकडून गाऊन घेतली नसली तरी येणारी पुढची १०-१५ वर्ष सी. रामचंद्र आणि लता युग निर्माण करणार होतं.

भारताच्या स्वातंत्राबरोबरचं ह्या सुवर्ण स्वरांचा उदय झाला आणि तो पुढची ७५ वर्ष निनांदला आणि तो स्वर अनंत काळ निनादत राहणार आहे. पण ह्या ‘हिमालय से उंचा’ स्वरांची सुरुवात कशी झाली, त्याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न. लताजींना आपल्यातून जाऊन एक वर्ष झालं आणि हेच वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचं ७५ वे वर्ष आहे.. आपल्याला ह्या गायिकेला गाताना आणि तो स्वर जगभर राज्य करताना अनुभवता आला हे आपलं परम भाग्य.

नितीन बापट