सोयगाव : गणेशोत्सव, ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडावा, यासाठी सोयगाव शहरात बुधवार, ४ रोजी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील दंगा काबू पथकाद्वारे पोलिसांनी रूट मार्च काढला.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय अधिकारी सिल्लोड डॉ.दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजार पट्टा, बसस्थानक परिसर आदी भागातून सोयगाव पोलीसांचा रूट मार्च निघाला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, पोलीस उपनिरीक्षक सतीश बडे, सफौ. दिलीप पवार, राजू बरडे, गजानन दांडगे, अजय कोळी, रवींद्र तायडे, प्रवीण देवरे, सादिक तडवी,शांताराम सपकाळ, आदींसह पोलीस कर्मचारी यांनी शहरातून रूट मार्च काढला. यावेळी गणेशोत्सव व ईद-ए- मिलाद काळात शहर वासियांनी शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी केले.
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद साठी सोयगाव शहरासोबत हद्दीतील गावात कडेलोट बंदोबस्त असून २४ तास पोलीस तैनात करण्यात आले आहे. सध्या स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी १९, तीन अधिकारी, व गृहरक्षक दल याप्रमाने शहर व हद्दीतील गावात बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी सांगितले.