मुंबई : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा केली. सुरुवातीला शाह यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली. ही बैठक जवळपास अर्धा तास चालली, त्यानंतर हे दोन्ही नेते सह्याद्री गेस्ट हाऊसवरून निघाले. या दोघांनंतर शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.
मंगळवारी रात्री सह्याद्री गेस्टहाऊसवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊन शाह यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा केली. या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघाला आहे. त्यानुसार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकूण १६ जागा दिल्या जातील. त्यातील ११ जागा शिवसेनेला तर ५ जागा राष्ट्रवादीला असा फॉर्म्युला निश्चित केलेला आहे. रायगड, परभणी, बारामती, शिरुर आणि आणखी एक जागा अजित पवारांना सोडण्यास भाजपाने तयारी दाखवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला केवळ जिंकण्याची क्षमता असणाऱ्या आधारे जागा मिळतील. काही जागांची अदलाबदली केली जाईल तर काही जागांवर गरज भासल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते असं बैठकीत ठरवण्यात आले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने २५ तर शिवसेनेने २३ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला होता. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंसोबत १३ खासदार आले आहेत.