राजस्थानातही गेहलोत आपल्या जवळच्या कोणाला तरी मुख्यमंत्रिपद देऊ इच्छितात, तर गांधी कुटुंब पायलट यांना. यावरुनच आमदारांनी अशोक गेहलोतांसाठी राजीनामे दिले, तर सचिन पायलटांना मात्र गांधी कुटुंबाचा आशीर्वाद आहे. त्यातून इथेही मुख्यमंत्रिपदासाठी पंजाबसारखी स्थिती तयार झाली आहे.
गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नकार दिल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचे नाव आघाडीवर होते. गेहलोतांच्या काँग्रेसाध्यक्षपदावर फक्त शिक्कामोर्तब बाकी असल्याच्या चर्चाही होत्या. पण, अशोक गेहलोतांना पक्षाध्यक्षपदापेक्षाही राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खुणावत होती. त्यामागे राजस्थानच्या उन्नतीचे नव्हे, तर सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळू नये, हेच कारण होते.
त्यासाठी गेहलोतांनी थेट गांधी कुटुंबाविरोधात आपल्या मर्जीतल्या आमदारांचे बंडनाट्यही घडवून आणले अन् त्यानंतर सोनिया गांधींची भेट घेऊन दिलगिरीही व्यक्त केली. तेव्हापासून अशोक गेहलोत गांधी कुटुंबासमोर दंडवत घातल्याच्या भूमिकेत आहेत. पण, याचे विपरित परिणाम येत्या काळात काँग्रेसच्या राजस्थानातील सरकारला अन् पक्षाच्या अस्तित्वालाही भोगावे लागणार आहेत.
गेहलोत आणि पायलट यांच्यातील संघर्ष आजचा नाही, तर त्याची सुरुवात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालापासूनच झाली होती. आपल्या मेहनतीमुळे पक्षाला राजस्थानमध्ये सत्तेच्या सोपानापर्यंत जाता आले व त्यामुळेच आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळावे, असे सचिन पायलट यांचे म्हणणे होते. पण, तसे झाले नाही अन् सोनिया गांधींनी अशोक गेहलोतांच्या हाती राजस्थानची सत्ता दिली. त्यानंतर २०२० मध्ये दोन्ही नेत्यांतील वाद विकोपाला गेला अन् पायलटांनी बंडखोरी केली. तेव्हापासून तर गेहलोत अन् सचिन पायलट यांच्यात विस्तव जाणार नाही, इतका दुरावा आला.
पायलट कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होऊ नयेत, म्हणून अशोक गेहलोत कामाला लागले तर गेहलोतांच्या हाताखाली काम करायला नको म्हणून सचिन पायलट कामाला लागले. आता अशोक गेहलोत काँग्रेसाध्यक्ष, तर पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होणार असे म्हटले जाऊ लागले. पण, तसे होणे गेहलोतांना मंजूर नव्हते. त्यातूनच त्यांनी काँग्रेसाध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. पण, यातून विद्यमान काँग्रेसाध्यक्षांच्या किंवा गांधी कुटुंबाच्या मर्यादाही उघड झाल्या. नेतृत्व खमके नसले की, पक्षात किती बजबजपुरी माजते, याचे हे उदाहरण!
काँग्रेसबाबत काहीसा असाच प्रकार पंजाबमध्येही झाला होता. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीआधी काँग्रेसच्या गटा-तटांतला संघर्ष शिगेला पोहोचला होता. वेगवेगळ्या पक्षात फिरून आलेल्या नवज्योतसिंग सिद्धूंनी आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. राजस्थानातही सचिन पायलट यांनी आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी एकदा बंडखोरी केली, पण अशोक गेहलोतांनी त्या बंडाला यश मिळू दिले नाही. तेव्हापासून दोघांतला वाद आणखी वाढला अन् संधी मिळताच गेहलोतांनी पायलटांविरोधात यथेच्छ भलीबुरी बडबड केली, तर प्रियांका अन् राहुल गांधींच्या जवळच्या सचिन पायलटांनी शांतता बाळगली.
पण, ही शांतता किती दिवस टिकेल? महत्त्वाचे म्हणजे पंजाबमध्ये गांधी कुटुंबाने अमरिंदर सिंगांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत सिद्धूंना प्रदेशाध्यक्ष केले. त्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी अमरिंदर यांच्याविरोधात बरळायला सुरुवात केली. आताही गांधी कुटुंबाने अशोक गेहलोतांना काँग्रेसाध्यक्ष करण्याचे ठरवले होते. पण, राहुल गांधींनी ‘एक व्यक्ती-एक पदा’चा उल्लेख करत मुख्यमंत्रिपदाबरोबरच काँग्रेसाध्यक्ष होण्याच्या गेहलोतांच्या इच्छेला सुरुंग लावला.
त्यातूनच अशोक गेहलोतांनी गांधी कुटुंबाविरोधात आपल्या जवळच्या आमदारांना बंडासाठी प्रवृत्त केले. कारण, त्यांना आपल्याला नाही, तर आपल्या जवळच्या कोणाला तरी मुख्यमंत्रिपदी बसवायचे होते, तर गांधी कुटुंबाला पायलटांना मुख्यमंत्री करायचे होते.
उल्लेखनीय म्हणजे, पंजाब निवडणुकीवेळी अमरिंदर सिंग व सिद्धूतील अंतर मिटवण्याची जबाबदारी प्रभारी हरिश रावतांची होती, पण तसे होण्याऐवजी ते अंतर अधिकच वाढले. कारण, हरिश रावतांचे लक्ष पंजाब सावरण्यापेक्षा आपले गृहराज्य उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीकडे होते. आता राजस्थानातदेखील प्रभारी अजय माकन व मल्लिकार्जुन खर्गेंवर सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बंडखोर आमदारांचे मन वळवण्याची जबाबदारी होती, पण तसे झाले नाही.
उलट पायलटांच्या जवळचे असल्याचे म्हणत अशोक गेहलोत गटातील आमदारांनी अजय माकन यांच्यावर भेदभावाचा आरोप केला, तर अजय माकन यांनी बंडखोर आमदारांचे उद्योग पक्ष शिस्तीचा भंग करणारे असल्याचे म्हटले. म्हणजेच, दोन्ही गटातील वाद आणखी वाढणार. उल्लेखनीय म्हणजे, पंजाबात नवज्योतसिंग सिद्धूंना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला व तिथे सत्तासंघर्ष तीव्र झाला. राजस्थानातही गेहलोत आपल्या जवळच्या कोणाला तरी मुख्यमंत्रिपद देऊ इच्छितात तर गांधी कुटुंब पायलट यांना. यावरुनच आमदारांनी अशोक गेहलोतांसाठी राजीनामे दिले, तर सचिन पायलटांना मात्र गांधी कुटुंबाचा आशीर्वाद आहे.त्यातून इथेही मुख्यमंत्रिपदासाठी पंजाबसारखी स्थिती तयार झाली आहे.
पंजाबात सर्व अंदाज चुकवत दलित चेहरा म्हणत गांधी कुटुंबाने चरणजितसिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केले, आता राजस्थानातही तसेच होऊ शकते. एक तर अशोक गेहलोत मुख्यमंत्रिपदी राहतील किंवा अन्य कोणी मुख्यमंत्री होईल. पण, त्यामुळे गेहलोत नाराज झाल्यास तिथले काँग्रेसचे सरकार जाण्याची शक्यता अधिक. काँग्रेसने निर्णय घेण्यात चूक केल्यास पंजाबात मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धू व चन्नींमध्ये संघर्ष झाला तसाच संघर्ष आगामी निवडणुकीत सचिन पायलट व अशोक गेहलोत गटात होण्याची शक्यता आहे. सिद्धूंना अध्यक्ष केल्यानंतर अमरिंदर यांनी पक्ष सोडला होता.
राजस्थानात विरोधात जाणारा निर्णय झाल्यास अशोक गेहलोत वा सचिन पायलट पक्ष सोडू शकतात व त्याने काँग्रेससमोर मोठे संकट उभे ठाकू शकते अन् गहलोतांना नाराज न करण्याचा निर्णय घेतल्यास पायलट पक्ष सोडू शकतात. म्हणजेच काँग्रेससाठी राजस्थानची स्थितीही पंजाबसारखीच होईल. आज तिथे काँग्रेस प्रभावहीन होत आहे, राजस्थानातही तशीच वेळ येईल.