विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तीन विधानसभा शरद पवार गटच लढणार ?

Assembly Elections : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या यशानंतर मविआचा आत्मविश्वास बळावला आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी घेतला. या आढाव्यादरम्यान सर्व ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये लढण्याची तयारी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील व अॅड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षात एकमत झाल्याची माहिती पक्षाच्या सुत्रांनी दिली आहे.

जयंत पाटील यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला. मतदारसंघामधील प्रमुख नेते, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुकाप्रमुख, विविध आघाड्यांच्या प्रमुखांकडून प्रदेशाध्यक्षांनी माहिती जाणून घेतली. यामध्ये प्रत्येक मतदारसंघानिहाय पदाधिकारी व नेत्यांना बोलावून घेत मतदारसंघातील पक्षाची स्थिती, विजयी होण्याची शक्यता, महाविकास आघाडीतील घटक पक्षांची स्थिती याबाबींचा समावेश होता. सर्व पदाधिकाऱ्यांनी जरी जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात पक्षाची तयारी असल्याचे सांगितले. तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणूनच लढविली जाणार असल्याने, काही जागा आपल्या मित्र पक्षाच्या खात्यात गेल्या. तरी मविआ म्हणून काम करण्याचीही तयारी ठेवण्याच्या सूचना दिल्या.

एरंडोल, जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगरात शरद पवार गटच लढणार ?
एरंडोल-पारोळा मतदारसंघाचा आढावा घेताना, या मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ. सतीश पाटील यांच्या एकमेव नावाचा ठराव केला. तर जळगाव ग्रामीणमधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावावर एकमत झाले. मुक्ताईनगरात अॅड. रोहिणी खडसे व विनोद तराळ यांनी इच्छा व्यक्त केली. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तराळ यांना यावेळेस थांबण्याच्या सूचना देत, अॅड. रोहिणी खडसे यांच्यासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या.