धुळे, ता. साक्री : भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सामोडे येथील २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना साक्री तालुक्यातील अष्टाणे गावाजवळ २ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी २१ जानेवारी रोजी साक्री पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र शंकर शिंदे ( २७, रा. दत्तनगर, सामोडे, ता. साक्री) हा एमएच १८ सीएफ ३४८९ क्रमांकाच्या दुचाकीवरून दहिवेलकडून साक्रीच्या दिशेने जात होता. सात वाजेच्या सुमारास अष्टाणे गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राजेंद्र हा जखमी झाला. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी २१ जानेवारी रोजी लुकेश राजेंद्र शिंदे ( २७, रा. गोरेगाव, मुंबई) यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हंसराज मोरे करत असून, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
अपघातांनी वाढवली चिंता
साक्री तालुक्यातील वाढत्या अपघातांच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने रस्ते सुरक्षेवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.