चटपटीत दही पापडी चाट रेसिपी

तरुण भारत लाईव्ह ।३१ मार्च २०२३। दही पापडी चाट या चमचमीत पदार्थाचं नाव ऐकता क्षणी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कमी सामग्रीमध्ये बनणारी ही रेसिपी अगदी अस्सल चाटचा आनंद आपल्याला देते. दही पापडी चाट ही रेसिपी उत्तर भारतातील प्रसिद्ध डिश असून ती लहान लहान पापड्या आणि दह्याचा वापर करुन बनवली जाते. दही पापडी चाट हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
पापडी, आवश्यकतेनुसार दही , आवश्यकतेनुसार धणे चटणी, आवश्यकतेनुसार चिंचेची चटणी, १ कप कांदा, उकडलेले बटाटे, १ चमचे चाट मसाला, १ चमचे जिरे पावडर,  कोथिंबीरीची पाने, आवश्यकतेनुसार मीठ, आवश्यकतेनुसार लाल मिरची, १ चमचे साखर, १  कप उकडलेले काळे चणे, आवश्यकतेनुसार शेव.

कृती 
सर्वप्रथम, एक वाटीत दही घ्या. आता या दह्यात साखर मिसळून ते बाजूला ठेवा.एका प्लेटमध्ये शेव पुरीसाठी वापरली जाणारी पापडी घेऊन त्यावर उकडलेल्या बटाट्यांचे काप ठेवा. आता त्यावर उकडलेले चणे, कांदा आणि दही टाका. मिश्रणात मीठ, जीरा पावडर आणि लाल तिखट टाका. आता त्यात कोथींबीर आणि चिंचेची चटणी मिक्स करुन चाट मसाल्याने गार्निश करा. सर्व्ह करण्याआधी कापलेली कोथींबीर आणि बारीक शेव त्यावर भुरभूरा आणि पापडी चाट सर्व्ह करा.