---Advertisement---
शहादा : नंदुरबार येथे घडलेल्या दोन गटातील वादंगानंतर चाकू हल्यात जखमी झालेल्या युवकाच्या मृत्यू झाल्याने घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी संतप्त झालेल्या विविध आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला शहादा शहरातूनही प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील अत्यावश्यक गरजेची प्रतिष्ठाने वगळता सगळीच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. सकाळी किरकोळ वर्दळ वगळता शहरात शुकशुकाट होता. सकाळी तालुक्यातील आदिवासी संघटनांनी निषेध मोर्चा काढून बंदचे आवाहन केले. बंद काळात पूर्णपणे शांतता असली तरी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. बंदच्या काळात शहरात शांतता होती.
मंगळवारी नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी व रायसिंग पुरा भागात दोन गटात हाणामारी झाल्याने शहरात अशांतता निर्माण झाली होती. या हाणामारीत एका युवकावर चाकूने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात परस्पर तक्रारीवरून गुन्हे नोंद केलेले आहेत. मात्र, या वादंगात चाकूने जखमी झालेल्या युवकाचे दुसऱ्या दिवशी निधन झाल्याने आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवकाचा मृत्यू झाल्याने विविध आदिवासी संघटना संतप्त झाल्या आहेत. युवक मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध आदिवासी संघटनांकडून नंदुरबार जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत शहादा शहर ही सकाळपासूनच सर्व प्रतिष्ठाने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवले होती. सकाळी काही प्रमाणात शहरात नागरिकांची वर्दळ दिसून आली असली तरी दुपारनंतर मात्र शहरात पूर्णपणे शुकशुकाट पसरलेले होते.
शहरात बंदला चांगलं प्रतिसाद मिळाला असला तरी शहरातील इस्पितळे, औषधी दुकानी, शाळा, महाविद्यालय आदी अत्यावश्यक प्रतिष्ठाने मात्र सुरळीत सुरू होती. कोणतीही अनुचित घटना घडवू नये म्हणून पोलीस विभागने सतर्कता घेतलेली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनात शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आले होते. शहरातील विविध भागातून पोलीस वाहन गस्ती घालत होते.
---Advertisement---

बंद दरम्यान परिवहन विभागाच्या आगाराततील बस फेऱ्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. लांब पल्ल्यासहित तालुक्यातील सर्व बस फेऱ्या सुरळीतपणे सुरू होत्या. सकाळी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. मात्र दुपारनंतर बस स्थानकात प्रवाशांची गर्दीही रोडावली होती. खाजगी प्रवासी वाहतुकीची वाहने मात्र यावेळी पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. बंदच्या काळात शहरात दुपारपर्यंत शांतता होती. बंदची माहिती नसल्यामुळे तालुक्यातील खेडोपाड्यातील जनता विविध कामासाठी व खरेदीसाठी शहरात येऊन दाखल झाले होते, परिणामी शहरात काही प्रमाणात गर्दी दिसून. आली मात्र दुपारनंतर ही गर्दीही ओसरली होती.
दरम्यान शहादा तालुक्यातील काही मोठ्या गावातील बंदचा काही प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला. मोठ्या गावातील प्रतिष्ठाने बंद होती. दरम्यान तालुक्यात कोणताही अनिचित प्रकार घडला नाही.