---Advertisement---
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील प्रस्तावित राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरात विकासाचे नवे दालन खुले होणार आहे. या केंद्रामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रशिक्षण केंद्रास गती मिळाली असून या केंद्रासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात ४६३ पदांची निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यासोबत १५ कोटी ९० लाख ७२ हजार रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी जागा पूर्वीच निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही काळ हा प्रकल्प अन्यत्र हलविण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व या भागाचे आ. संजय सावकारे यांच्या नेहमीच्या पाठपुराव्यामुळे वरणगाव येथीलच केंद्रास अंतिम मान्यता मिळाली आहे. जुलै २०२४ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आली, तर ऑगस्ट २०२४ मध्ये गृहविभागाने अधिकृत शासन निर्णय जारी केला. त्यानंतर केंद्राच्या उभारणीला वेग आला आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला वरणगावचा प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. पोलिस महासंचालकांच्या शिफारशीच्या आधारे शासनाने याला मान्यता दिली असून, बांधकाम विभागाकडे जागेचा अंतिम प्रस्ताव दिला गेला आहे.
गृहविभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण १ हजार ३८० पदांची निर्मिती प्रस्तावित असून, पहिल्या टप्प्यात ४६३ पदांची भरती केली जाईल. यात ४५० पदे नियमित असून, १२ पदे कंत्राटी पद्धतीने बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येणार आहे. नियमित पदांमध्ये समावेश समादेशक (अ-वर्ग): १, सहायक समादेशकः १ , पोलिस उपअधीक्षकः २, पोलिस निरीक्षकः ३ पोलिस उपनिरीक्षकः ८, सहायक उपनिरीक्षक : २०, पोलिस हवालदार : ४०, सशख पोलिस शिपाईः २५१, मोटार परिवहन व बिनतारी संदेश विभागातील विविध पदे, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कंपाउंडर , कार्यालयीन कर्मचारी लिपिक, लेखापाल, अधीक्षक आदी. कंत्राटी पद्धतीने भरली जाणारी १२ पदेः मोची, शिंपी, माळी, आया, रुग्णसेवक, स्वयंपाकी, भोजन सेवक, सफाई कामगार आदी.
मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, या केंद्राच्या माध्यमातून सुमारे १ हजार ५०० कुटुंबे वरणगाव परिसरात स्थायिक होतील. यामुळे शिक्षण, आरोग्य, वाहतूक अशा क्षेत्रात विकासाला चालना मिळणार आहे. या परिसरात ‘सीबीएसई” शाळाही सुरू होणार असून स्थानिक तरुणांसाठी प्रशिक्षणाची चांगली संधी उपलब्ध होणार आहे, असेही ते म्हणाले.