---Advertisement---
Taloda Bus Accident : तळोदा तालुक्यातील भवर गावाजवळ आज, बुधवारी सकाळी एसटी महामंडळाच्या बसला मोठा अपघात झाला. या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हेरी येथून बस (क्र. एम.एच. ०६ एस ८६६१) ही विद्यार्थ्यांना घेऊन तळोद्याकडे निघाली होती. दरम्यान, भवर गावाजवळ एस. टी. बस पलटी झाली. या अपघाताची माहिती मिळताच गावातील स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. सुरुवातीला ३० ते ३५ विद्यार्थी जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता, परंतु तळोदा येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर हा आकडा ७० वर पोहोचला आहे.
आमदार राजेश पाडवींची दखल
अपघाताची माहिती मिळताच शहादा- तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यांचे स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी आणि कलावती फाउंडेशन सहायता केंद्राचे योगेश मराठे यांनी देखील मदतकार्यात योगदान दिले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दुसरीकडे, या घटनेमुळे पालक आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर पालकांनी, नातेवाईकांनी आणि शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जखमी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार केले जात असून, तळोदा पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, हा अपघात कसा झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बस चालकांनी आणि वाहतूक विभागाने अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थी सुरक्षित प्रवास करू शकतील यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.