Yavatmal Accident News : एसटी बसला भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार, 88 प्रवासी जखमी

यवतमाळ : यवतमाळ-किनवट एसटी बसला झालेल्या भीषण अपघातामध्ये एक दुचाकीस्वार ठार झाला, तर 88 प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात घाटंजी तालुक्यातील माणोली ते दहेगाव परिसरात घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बसने एका दुचाकीला धडक दिली, ज्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मृतकाचे नाव नंदू चव्हाण असून तो जळका तालुका राळेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

समोरून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या खाली घसरली, आणि बसला मोठा धक्का बसला. या अपघातात बसमधील 88 प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि रुग्णालयातील अधिकारी तातडीने पोहोचले. अपघाताची अधिक तपासणी सुरू असून संबंधित चालकावर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

दारू आणून दिली नाही म्हणून तरुणाला मारहाण

यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात चुंचाळे रस्त्यावर एका २५ वर्षीय तरुणाला दारूची बाटली आणून देण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनगाव बुद्रुक (ता. यावल) येथील चुंचाळे रोडवर पंकज सुरेश पाटील (वय २५) हा तरुण उभा असताना गावातील गणेश मोहन चौधरी हा तेथे आला. त्याने पंकजला दारूची बाटली आणून देण्यास सांगितले. मात्र, पंकजने हे काम करण्यास नकार दिला. या नकाराचा राग येऊन गणेश चौधरी याने पंकजला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

यामध्ये त्याच्या दोन्ही पायांना बल्लीने मारून गंभीर जखमी केले, तसेच डोक्यावर वार केला. त्यामुळे पंकजला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पंकज पाटीलने यावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गणेश मोहन चौधरी याच्या विरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत.