मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील १३ संघटनांनी संप पुकारला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. यामुळे पुन्हा एकदा एसटीची चाके थांबण्याची शक्यता आहे.
सन २०२१ मध्ये सलग ५४ दिवस सुरू असलेला संप मागे २० डिसेंबर २०२१ रोजी मागे घेतला होता. त्यानंतर राज्य शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, असा आरोप करत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी संपाची हाक पुकारली आहे.
या आहेत मागण्या
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे.
- कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळणेबाबत
- घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी
- सन २०१६-२०२० या कालावधीसाठी जाहिर केलेल्या रू.४८४९ कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी
- सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट ५००० रुपयांची वाढ करावी