मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर आजपासून (24 जानेवारी) प्रवास महागला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. एसटी महामंडळाने 14.95 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याला राज्य परिवहन प्राधिकरणाने (एसटीए) मान्यता दिली आहे.
परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “एसटी कर्मचाऱ्यांचे पगार, इंधनाचे दर, तसेच सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती यामुळे ही दरवाढ करावी लागली आहे. मागील तीन वर्षांपासून भाडेवाढ झालेली नव्हती, त्यामुळे यंदा ती अपरिहार्य ठरली आहे.”
दरम्यान, ऑटोरिक्षा व टॅक्सीच्या दरवाढीचा निर्णय 1 फेब्रुवारीपासून लागू होईल. टॅक्सी व रिक्षा संघटनांच्या मागणीनुसार, ऑटोरिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये करण्यात येणार आहे. रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत अंतिम निर्णय ऑक्टोबर 2022 नंतर आता घेतला जात आहे.
एसटी दरवाढीमुळे प्रवाशांचे आर्थिक गणित कोलमडणार?
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळाच्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
सरनाईक यांनी सांगितले की, “डिझेल, सीएनजी, आणि एसटीच्या सुट्या पार्ट्सच्या किंमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे ही दरवाढ गरजेची होती. प्रलंबित दरवाढीनंतर आता एसटी महामंडळ आर्थिक स्थैर्य मिळवेल, अशी अपेक्षा आहे.”
दरवाढ लागू झाल्यामुळे सामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांतील लोकांच्या दैनंदिन प्रवासावर या दरवाढीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.