लालपरी पुन्हा होणार ठप्प… काय आहे कारण?

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लालपरी ठप्प होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना दुपारी 12 वाजता चर्चेसाठी बोलावलं आहे. एसटी कामगारांचे आर्थिक आणि महत्त्वाचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. म्हणूनच एसटी कामगार संघटनेकडून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, उदय सामंत यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून मार्ग न निघाल्यास 13 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत उपोषणाचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. महागाई भत्ता 42 टक्के करावा, महामंडळाला अर्थसहाय्य करावे, कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशा कामगार संघटनेच्या मागण्या आहेत.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवस संप केला होता. राज्य सरकारने मेस्मा लागू केला होता. अखेर हा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले. परंतु ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगार संघटना आजपासून आझाद मैदानात उपोषण करणार आहेत.