जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२४ । राज्यासह जळगावात थंडीची चाहूल लागू लागली आहे. रविवारी जळगावात किमान तापमान १५ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे थंडी वाढू लागली असून जळगावकर पहाटे व रात्रीच्यावेळी कुडकुडत आहेत.
यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे थंडी देखील लांबली. यातच आता पावसाने पूर्णपणे माघार घेतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. हिंद महासागरात मालदीव आणि विषुववृत्ताजवळच्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पुढील काही दिवसांत राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी धुळ्यातील कमाल तापमान १२.६ अंशची नोंद झाली आहे. तर जळगावसह परभणी (कृषी), गडचिरोली, गोंदिया, ब्रह्मपूरी, नागपूर, अमरावती येथे किमान तापमान १५ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्याशिवाय उर्वरित राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे.
जळगावात शहरात रविवारी किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे; परंतु आता हुडहुडी अधिक वाढणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील ढगाळ वातावरण आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे १८ तारखेपासून पहाटेचे किमान तापमान १२ अंशांवर पोहोचणार आहे. उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रवाह पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांकडून वर्तविण्यात आला आहे.
जळगाव शहरात हळूहळू थंडीचा जोर वाढत आहे. सकाळी, रात्री थंडीचा अनुभव येत असून, दुपारी मात्र चटके जाणवत आहेत. सध्या किमान तापमान १४.६ अंशांवर तर कमाल तापमान ३३ अंशांवर आहे. आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात आणखी घट होणार आहे. १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान पहाटेचे तापमान हे १२ अंशांवर जाणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला.