तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ विस्ताराला महत्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी मागणी शिंदे यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेचा वर्धापन दिन १९ जून रोजी असतो. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. यावेळचा मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजप मिशन ४५ डोळ्यासमोर ठेवणार आहे. लोकसभा निवडणुकीत फायदेशीर ठरतील अशा नेत्यांना मंत्री म्हणून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते समाधानकारक कामगिरी करु न शकल्यानं त्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास शिंदे यांच्यासोबत असलेल्य खासदारांपैकी दोन नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या खासदारांपैकी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा यापूर्वी झाली होती. राज्य व केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार नेमका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.