जळगाव । जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. राज्यात २८८ तर जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक होत असून बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या सर्वच्या सर्व ११ जागांवर आजी माजी आमदारांच्या आमने सामने अटीतटीच्या लढती होत आहेत. यात जळगाव शहर, पाचोरा-भडगाव, मुक्ताईनगर या तीन मतदारसंघांमधील लढली लक्षवेधी ठरणार असून जिल्ह्यातच नव्हेतर राज्यात विशेष चर्चेत असल्याचे दिसून येत आहेत. अन्य मतदारसंघांमधील निवडणूक लढती या पारंपरिक उमेदवारांमध्ये असल्याने कोणीही आले तरी विकास त्याच्या पद्धतीने होतच राहणार असे म्हणून पाहिले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघ असून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी गेल्या दोन अडीच वर्षांपासूनच बहुतांश मतदारसंघात सुरू झालेली आहे. जिल्ह्यात ११ जागांपैकी ६ जागांवर आजी माजी आमदारांमध्ये लढत आहे. अमळनेर मतदारसंघात विद्यमान आमदार तथा मंत्री अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी या आजी- माजी आमदारांमध्ये आणि नवीन उमेदवारी करीत असलेले डॉ. अनिल शिंदे यांच्यात लढत आहे.
अमळनेर मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील आणि गुलाबराव पाटील वगळता अन्य उमेदवारांना पुन्हा संधी मिळालेली नाही. २००९ मध्ये पारोळा तालुक्यातील रहिवासी अपक्ष उमेद्वार साहेबराव पाटील, तर २०१४ मध्ये नंदुरबारचे रहिवासी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी हे विजयी झाले होते. चौधरी यांनी विजयी झाल्यानंतर भाजपाला समर्थन दिले होते.
एरंडोल मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा कोणताही लोकप्रतिनिधी विजयी झालेला नसून मतदार उमेदवारांना आलटून पालटून संधी देतात. या वेळेस माजी आमदार डॉ. सतीश पाटील, भाजपाचे बंडखोर माजी खासदार ए. टी. पाटील आणि विद्यमान आमदारांचे पुत्र अमोल पाटील यांच्यात लढत आहे.
चाळीसगाव मतदारसंघात विद्यमान आमदार मंगेश चव्हाण भाजपाकडून तर त्यांच्या विरोधात उबाठा गटाकडून माजी खासदार उन्मेष पाटील निवडणूक लढवित आहेत. जामनेर मतदारसंघात मंत्री तथा विद्यमान आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात त्यांचेच जुने सहकारी व राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेले दिलीप खोडपे आमने सामने आहेत.
भुसावळ मतदारसंघ राखीव असून तेथेही विद्यमान आमदार संजय सावकारे यांची चौथी टर्म असून त्यांच्या विरोधात जगन सोनवणे निवडणूक लढवित आहेत. चोपडा मतदारसंघदेखील राखीव असून त्यात माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे निवडणूक लढवित आहेत.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात आजी-माजी पालकमंत्र्यांमध्येच पारंपरिक लढत आहे. या सात जागांवर आजी-माजी आमदार आमने-सामने आहेत. जळगाव शहर मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्या विरुद्ध त्यांचेच सहकारी भाजपाचेच माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे अपक्ष, तर माजी महापौर जयश्री महाजन आणि उबाठाचेच परंतु बंडखोर माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे बंडखोर उबाठाचे सक्रिय सदस्य निवडणूक लढवित आहेत.
तर चौथा प्रतिस्पर्धी मनसेतर्फे उमेदवारी करीत आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात लक्षवेधी आणि जोरदार रस्सीखेच असलेली दुसरी लढत आहे. २०१४ च्या मोदी लाटेत आणि विरोधी पक्षांच्या आमदारांवर लागलेल्या भडक आरोपांमुळे ते निवडून आले. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांना ७३ हजार ६१५ तर किशोर पाटील यांना ७५ हजार ६९९ मते मिळाली होती. यात अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता. तर माजी आमदार दिलीप वाघ तिसऱ्या क्रमांकावर होते. आमदार पाटील हे तिसन्यांदा नशीब अजमावत असून त्यांच्या समोर अमोल शिंदे यांनी अपक्ष म्हणून तर आमदार पाटील यांच्या चुलतभगिनी वैशाली सूर्यवंशी उबाठा गटाकडून, स्वराज्य पक्षाकडून स्थानिक शैक्षणिक संस्थाचालक प्रताप हरी पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, नामसाधर्म्य असलेले दोन अपक्ष उमेद्वार निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात खरी चुरशीची लढत आमदार पाटील आणि अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्यात असल्याचे दिसून येत आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे परंतु राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे यांचा दारुण पराभव केला होता. या वेळी मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अॅड. रोहिणी खडसे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात लढत असून अन्य जिल्ह्यातील रहिवासी तसेच नामसाधर्म्य असलेल्या तीन महिला आणि चंद्रकांत पाटील नावाच्या दोन अपक्षांसह १७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. असे असले तरी खरी लढत अॅड. रोहिणी खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आहे.
रावेर मतदारसंघातून आजी व माजी आमदारांचे पुत्र निवडणूक रिंगणात आहेत. यात दिवंगत माजी खासदार-आमदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे हे भाजपाचे तर धनंजय चौधरी हे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र निवडणूक लढवित आहेत.
दरम्यान, २०१४ मध्ये जळगाव शहर, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ आणि चाळीसगाव अशा ६ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. तर अमळनेर येथे अपक्ष आणि एरंडोल येथे राष्ट्रवादीला जागा मिळाली होती. परंतु २०१९ च्या निवडणुकीत भाजपला मुक्ताईनगर, रावेर या जागा गमवाव्या लागल्या, तर चोपडा, पाचोरा, जळगाव ग्रामीण या तीन जागांवर असलेल्या शिवसेनेने एरंडोलदेखील मिळवत भर टाकली.