राज्याचा पारा ३५ अंशावर, हवामान विभाग काय म्हणतंय?

तरुण भारत लाईव्ह ।०८ फेब्रुवारी २०२३। राज्यात आता थंडी कमी होऊ लागली असून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. मागील दोन दिवसांत राज्याचा पारा 35 अंशांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

गेल्या महिन्याच्या अखेरीस राज्यातील अनेक भागात पावसाने किरकोळ हजेरी लावली. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मात्र, आता निरभ्र आकाश होताच राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.

पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा तडाखा
दरम्यान, तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा तडाखा अशी स्थिती अनुभवायला येत आहे. त्यामुळे हा हिवाळा की उन्हाळा असा प्रश्न नागरिकांना पडू लागलाय. कमाल आणि किमान तापमानात 13 ते 24 अंशांपर्यंत तफावत नोंदली जात आहे. दरम्यान विदर्भातील ब्रह्मपूरू येथे राज्यातील उच्चांकी 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अमरावती आणि सोलापूर येथेही कमाल तापमान 35 अंशांवर नोंद झाली.

राज्यात तापमानाची स्थिती कशी
राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 34.1 (11.5), जळगाव 33.7 (10.0), धुळे 31.5 (12.5), कोल्हापूर 33.6 (17.8), नाशिक 31.9 (12.9), सांगली 33.8 (17.2), सातारा 33.3 (14.4), सोलापूर 35.4 (17.6), रत्नागिरी 33.0 (18.5), औरंगाबाद 32.2 (12.6), नांदेड 33.2 (16.6), परभणी 33.5(15.3), अकोला 35.0(14.3), अमरावती 33.8(12.5), बुलडाणा 32.0(15.8), चंद्रपूर 32.2 (13.0), गडचिरोली 31.0 (11.8), गोंदिया 32.8 (13.2), नागपूर 32.1 (13.3), वर्धा 33.0 (15.4), वाशिम 33.2 (16.8), यवतमाळ 33.5 (14.5) तापमानाची नोंद झाली.