तरुण भारत लाईव्ह । २३ फेब्रुवारी २०२३। शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांबाबत मनपा प्रशासन अद्यापही उदासिन असून प्रचंड रहदारी असलेल्या या रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. याचा येणार्या-जाणार्या नागरिकांना मोठा त्रास होत असतो. या रस्त्यांच्या कामांना गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून रस्ते कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. बरीच कामे मंजुरही झाली आहेत. गेल्या आठवड्यात मनपाच्या महासभेत रस्ते कामांवरून खडाजंगी झाली होती. रस्ते कामांवरून भाजपच्या काही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र तरीही अद्याप प्रशासन तसेच सत्ताधारी जागे झाल्याची मनपात परिस्थिती नाही.
प्रमुख रस्त्यांबाबत उदासिनता
आकाशवाणी चौकाकडून महाबळ चौक व पुढे महाबळ चौकापासून छत्रपती संभाजी राजे चौक या भागातील रस्ता अतिशय खराब झाला आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. यात प्रामुख्याने भाऊंचे उद्यान परिसरातील रस्त्याची अतिशय दैना झाली आहे. या ठिकाणी वाहने आली की खोळंबा होतेच होतो. त्यातच डीएसपी बंगला कॉर्नरवर सतत काम सुर असते. यामुळे आदर्श नगरकडे जाणार्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. पुढे महाबळ कॉलनीकडे जाणारा रस्ता तसेच राजे संभाजी चौकाकडील रस्ताही अतिशय खराब झाला आहे. संभाजी चौकातकडे जाणार्या रस्त्याने तर खराब रस्त्यामुळे एकमार्गी वाहतूक होत असते. या रस्त्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी शेकडो वाहने दिवसभर येत-जात असतात. आदर्श नगरकडील काही भागातही रस्त्याचे काम चांगले झालेले नाही. महाबळ परिसरातील नागेश्वर कॉलनी, समता नगर तसेच लाईफ स्टाईलकडे जाणारा रस्ताही अतिशय खराब झाला आहे. या भागात अमृत योजनेची कामे झाल्यानंतर चारीवर डांबरीकरण करणे आवश्यक असताना ते केले गेले नाही. तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे हा रस्ता अधिकच खराब आहे. तसेच मोहन नगरकडील रस्तेही खड्डेमय आहेत. येथेही दोन्ही कामे झाली आहेत.
रिंगरोडला जाणार्या रस्त्यांकडे दुर्लक्ष
रिंगरोडला जोडणार्या रस्त्याचीही दैना आहे. मणियार लॉ कॉलेजकडील रस्ता, आएमआरकडील रस्त्याची दैना झाली आहे. एम.जे.कॉलेज मागील भागातील रस्त्यांची दुरवस्था आहे. यासह पुष्पलता बेंडाळे चौकाकडून नेरी नाक्याकडे जाणारा रस्ता, जिल्हा पेठेतील बस स्थानकामागील रस्ता, आर.आर. विद्यालयाकडून सिव्हील हॉस्पिटलमागील काही रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. या भागात भुयारी गटारी तसेच अमृत योजनेच्या पाईप लाईनची काम होऊनही रस्त्याची कामे सुरू नाहीत. यासह निमखेडी रस्त्याकडील उपनगरांमधील रस्त्यांचीही दैना झाल्याचे पहायला मिळत असून या कामांना गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.