शारापूर : अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उदघाटन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. तसेच हिंदू संघटनाकडून अनेक ठिकाणी अक्षता वाटप केल्या जात आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशच्या शाजापूर येथे हिंदू संघटनांनी काढलेल्या अक्षता वाटप मिरवणुकीवर दगडफेक करण्याची घटना घडली आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला, तर पोलिसांनी कारवाई करताना आठ लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच २४ ज्ञात आणि १५ ते २० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाजापूरमध्ये सायंकाळी ७.३० मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर ८.३० वाजता सात ते आठ लोकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या परिसरात मिरवणूक काढू नका, असे या लोकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर मिरवणुकीवर दगडफेक झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात ठिकठिकाणी गस्त घालणारे पथक तैनात केले आहे. तसेच शाजापूर शहरात कलम १४४ लावून प्रतिबंधक उपाय राबविले आहेत.
मिरवणुकीवर झालेला हल्ला नियोजित असल्याचा आरोप भाजप खासदार महेंद्र सोलंकी यांनी केला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. आठ जणांना सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहे. इतरांचा शोध सुरू आहे. जर गरज भासल्यास आरोपींच्या घरावर हातोडा पडू शकतो. दुसरीकडे काँग्रेसने मात्र या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेमागे भाजपाचाच हात आहे, असा आरोप काँग्रेसने केला.