अतिक्रमण काढणाऱ्यांवर दगडफेक, गारबर्डी गावाजवळील घटना

जळगाव : रावेर तालुक्यातील गारबर्डी गावाजवळ स्थानिकांनी वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महसूल, पोलिस व वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणधारकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना (ता. ४) दुपारी एकच्या सुमारास घडली. यात पाच ‘जेसीबीं’चे मोठे नुकसान झाले असून एका ‘जेसीबी’ चालकाला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गारबर्डी गावाजवळील मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या कंपार्टमेंट क्रमांक २४ आणि २५ मध्ये दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असलेले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसले होते. त्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना हटकले असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. विभागाच्या विनंतीनुसार आज महसूल व पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी गेले. यात सुमारे १५० जणांचा सहभाग होता.

अतिक्रमण काढण्यासाठी मोठा फौजफाटा आल्याचे पाहून अतिक्रमण करणारे संतप्त झाले. अशातच ‘जेसीबी’चा धक्का लागल्याचे निमित्त करून अतिक्रमण करणाऱ्या चाळीस ते पन्नास जणांनी अतिक्रमण काढण्यासाठी विरोध केला व अचानक ‘जेसीबीं’सह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रचंड दगडफेक केली. ज्यात एक कर्मचारी डोक्याला दगड लागल्याने गंभीर जखमी झाला.

अतिक्रमणधारकांचा संताप काहीसा ओसरल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना शांत करून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा वन हक्क दावा मंजूर नसून त्यांनी अतिक्रमण केलेले आहे, असे सांगून अधिकाऱ्यांनी तेथील चार ते पाच झोपड्या तोडून अतिक्रमण नष्ट केले. तसेच त्यांनी नांगरलेली सुमारे १५ एकर जमीन पुन्हा ताब्यात घेतली. शासकीय कारवाईत अडथळा केल्याबद्दलचा गुन्हा वन विभागामार्फत नोंदविण्यात आला.