गुन्ह्यांची एक्सप्रेस रोखण्यासाठी हवा जादा कर्मचार्‍यांचा ‘भुसावळात थांबा’

तरुण भारत लाईव्ह । भुसावळ : गणेश वाघ – रेल्वेचे जंक्शन म्हणून राज्यात भलेही भुसावळची ओळख असलीतरी गुन्हेगारांसाठी पर्वणीदेखील हे ‘जंक्शन’ ठरू पाहत आहे. ब्रिटीशकालीन मंजूर पदांचा विचार केल्यास तीन अधिकार्‍यांसह 124 पदांना येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात मंजुरी आहे मात्र शोकांतिका म्हणजे केवळ 56 कर्मचारी आजघडीला कार्यरत असल्याने प्रवाशांची सुरक्षा होणार कशी? हा मोठा प्रश्न आहे. त्यातच नेत्यांसाठी, आंदोलनासाठी बंदोबस्त, साप्ताहिक रजा, आजारपणामुळे घ्याव्या लागणार्‍या सुट्या पाहता त्रोटक कर्मचारी लाखो प्रवाशांच्या मालमत्तांचे संरक्षण करणार कसे वा गुन्हे उघडकीस येणार कसे ? हा देखील मोठा प्रश्न आहे. रेल्वेतील गुन्हेगारी रोखण्यासाठी मंजूर पदांसह वाढीव कर्मचारी लोहमार्ग पोलीस ठाण्यात नियुक्त करावेत, अशी मागणी होत असून औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी हा प्रश्न सोडवण्याची अपेक्षा आहे.

124 पदे मंजूर मात्र कार्यरत केवळ 56 कर्मचारी

ब्रिटीशकालीन मंजूर पदानुसार भुसावळ लोहमार्गसाठी एक अधिकारी, एक सहाय्यक निरीक्षक व दोन उपनिरीक्षक तसेच 12 एएसआय, 30 हवालदार, 20 नाईक, 61 कॉन्स्टेबल अशी 124 पदे मंजूर आहेत मात्र प्रत्यक्षात कार्यरत अधिकार्‍यांमध्ये एक निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक तसेच 14 एएसआय, 23 हवालदार, 10 कॉन्स्टेबल, नऊ नाईक कार्यरत आहे. यातील एका उपनिरीक्षकासह आठ कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणी जळगाव रेल्वे स्थानकावर कार्यरत आहे.

कामे थोडी मात्र सोंगे फार

मूळात लोहमार्ग पोलिसांचे कर्तव्य रेल्वे प्रवाशांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासह गुन्ह्यांना रोखणे व उघडकीस आणणे आहे मात्र रेल्वे रूळांवर होणारी आंदोलने, सण-उत्सवासासाठीचा बंदोबस्त, मंत्री-संत्री रेल्वेतून प्रवास करताना द्यावा लागणारा बंदोबस्त यातच यंत्रणेचा मोठा वेळ खर्ची पडतो. या शिवाय रेल्वे कर्मचार्‍यांची साप्ताहिक सुटी, रजा, आजारपण, कौटूंबिक कारणास्तव घ्याव्या लागणार्‍या सुट्या तसेच एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी जावे लागल्यास तीन ते चार कर्मचार्‍यांना सोबत घ्यावे लागते त्यामुळे यंत्रणेच्या मूळ कार्यालाच बाधा पोहोचते. अलीकडील काळात गुन्हे वाढले तरी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ 16 टक्के आहे. बदलत्या काळात गुन्हेगार नवनवीन ट्रीक्स वापरून गुन्हे करीत असताना लोहमार्ग यंत्रणा मात्र तोकड्या कर्मचार्‍यांच्या बळावर गाडा हाकत आहे. यंत्रणेला हायटेक होण्यासह आता गुन्ह्यांच्या तपासाच्या पद्धत्तीतही बदल करावा लागणार आहे शिवाय हेह करताना जादा मनुष्यबळ आवश्यक आहे व त्यानंतरच गुन्हेगारी मोडीत निघेल.

गुन्ह्यांना रोखण्याचे मोठे आव्हान

रेल्वे स्थानकातील वाढत्या गर्दीमुळे सोनसाखळी चोरी, पाकीट मारी, बॅग लिफ्टिंग, मोबाईल चोरी, हणामारी, महिलांसह तरुणींची छेडखानी आदी विविध प्रकार रेल्वे स्थानकावर तसेच रेल्वे गाड्यांमध्ये घडतात. गेल्या काही वर्षात या गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. गुन्ह्यांना रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांपुढे आहे. त्यातच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वे पोलिसांवरच आल्याने मनुष्यबळ नसल्याने अडचणी अधिक वाढल्या आहेत. औरंगाबाद लोहमार्ग अधीक्षकांसह गृह विभागाने दखल घेण्याची अपेक्षा आहे.

गुन्ह्यांना रोखण्याचे मोठे आव्हान

रेल्वे स्थानकातील वाढत्या गर्दीमुळे सोनसाखळी चोरी, पाकीट मारी, बॅग लिफ्टिंग, मोबाईल चोरी, मारामारी, महिलांसह तरुणींची छेडखानी आदी विविध प्रकार रेल्वे स्थानकावर तसेच रेल्वे गाड्यांमध्ये घडतात. गेल्या काही वर्षात या गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. या गुन्ह्यांना रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांच्या समोर आहे. त्यातच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वे पोलिसांवरच आल्याने मनुष्यबळ नसल्याने अडचणी अधिक वाढल्या आहेत. औरंगाबाद लोहमार्ग अधीक्षकांसह गृह विभागाने या संदर्भात गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा आहे.

मग प्रवाशांची सुरक्षा होणार कशी ?

भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यांतर्गत नऊ प्लॅटफार्मवर पोलिसांना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त द्यावा लागतो शिवाय भुसावळ हद्दीत 14 स्टेशन येतात. त्यात भुसावळसह वरणगाव, बोदवड, दुसखेडा, सावदा, निंभोरा, रावेर, वाघोडा, भादली, जळगाव, शिरसोली, म्हसावद, माहेजी, परधाडे आदी स्थानकांचा समावेश आहे.

भुसावळात गुन्ह्यांची एक्सप्रेस सुसाट

दोन वर्ष कोरोना आल्यानंतर रेल्वे गाड्या बंद होताच गुन्ह्यांनाही ब्रेक लागला तर परीस्थिती हळूहळू निवळू लागताच कोरोना चाचणी झालेल्या प्रवाशांना तपासणी होवून रेल्वेत प्रवास मिळू लागल्यानंतरही गुन्ह्यांचे प्रमाण शून्यावर आल्याने यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला मात्र कोरोना हटताच प्रवासी संख्या वाढल्याने आता क्राईम आलेख उंचावला आहे. प्रवासी झोपल्यानंतरच रेल्वेत गुन्हे होण्याचे प्रमाण अधिक आहे शिवाय प्रवाशाला जेव्हा जाग येते तोवर गाडीने अनेक जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र ओलांडलेले असते त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीनुसार तक्रार दाखल होते मात्र प्रत्यक्षात चोरी कुठल्यातरी वेगळ्याच स्थानकावर झाल्याने गुन्हेगारांचे फावते व असे गुन्हे डिटेक्टच होत नसल्याने गुन्हेगारीचा आलेख उंचावतच जातो.

कर्मचारी वाढल्यास निश्चितच गुन्ह्यांना आळा : निरीक्षक विजय घेर्डे

मंजूर संख्येप्रमाणे अधिकारी व कर्मचारी संख्या वाढल्यास निश्चित रेल्वे स्थानकावर अधिक बंदोबस्त वाढवता येईल व त्या माध्यमातून चोर्‍या रोखण्यात मदत होईल. अल्प कर्मचार्‍यांमुळे डिटेक्शन व प्रिव्हेंशन होण्यास अडचणी येतात मात्र कर्मचारी संख्या वाढल्यास अप्रिय घटना निश्चित टळतील, असा विश्वास भुसावळ लोहमार्ग निरीक्षक विजय घेर्डे यांनी ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.