रावेर : रावेर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून तालुक्याचे मुख्यालय आहे. केळीच्या उत्पादनात देशात अग्रस्थानी असलेल्या या तालुक्यातून दररोज उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात केळी रेल्वेद्वारे पाठवली जातात. यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. मात्र, पुण्याकडे जाणाऱ्या दानापुर-पुणे एक्सप्रेस आणि जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस या गाड्यांना रावेर स्थानकावर थांबा नसल्यामुळे स्थानिक प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि उपचारांसाठी दररोज रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या१२०० ते१५०० दरम्यान आहे. सध्या या प्रवाशांना खासगी बससेवा आणि दोन एसटी बसवर अवलंबून राहावे लागते.यामुळे त्यांना ९०० ते १००० रुपयांपर्यंतचा खर्च आणि वेळेची हानी सहन करावी लागते. परिणामी खासगी बस व्यवसायिकांना दररोज दहा लाखांहून अधिक उत्पन्न मिळते, तर रेल्वेला मोठ्या प्रमाणात संभाव्य महसुलापासून वंचित राहावे लागत आहे.
इटारसी भुसावळ मेमुची वेळ सकाळी करावी
यासोबतच, पूर्वी सुरू असलेली इटारसी-भुसावळ पॅसेंजर ट्रेन बंद झाल्यामुळे सकाळच्या वेळात भुसावळ आणि जळगावकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही अडचण होते. सध्या चालू असलेली इटारसी-भुसावळ मेमो एक्सप्रेस मध्यरात्री नंतर पहाटे आहे. जी प्रवाशांना लाभदायक ठरत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते आठ वाजे दरम्यान ही गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर रावेरमधील विविध संस्था, संघटना आणि प्रवासी वर्गाच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे लेखी निवेदन देण्यात आले असून प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने दानापुर-पुणे एक्सप्रेस आणि जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस दोन्ही एक्सप्रेस गाड्यांचा रावेर स्थानकावर थांबा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था तर्फे रजनीकांत बारी, संजय बुवा, पवन शिरनामे, विजय बारी, पुंडलिक महाजन, प्रवीण बारी, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मंडळ रेल्वे प्रबंधक भुसावळ यांच्याकडे केली आहे.