नंदुरबार : शहरात दोन गटात तूफान दगडफेक झाली. यात मोटर सायकलची जाळपोळ करण्यात आली. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात घडली. दरम्यान या घटनेनंतर पाेलिसांनी 22 जणांवर गुन्हा नाेंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर पाेलीस अधीक्षक पी आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी संशयितांची धरपकड करण्यास प्रारंभ केला. पाेलिसांनी सुमारे 15 ते 20 संशयितांना ताब्यात घेतले.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी कडेकाेट पाेलिस बंदोबस्त ठेवला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात झालेल्या मारामारीनंतर एकूण बावीस संशयितांना अटक करण्यात आली आहे. काही संशयितांचा शाेध सुरु आहे. संशयितांवर आरोपींवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येणारे सण उत्सव लक्षात घेता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सायबर सेलकडून सोशल मीडियावर देखील वाॅच ठेवले जाणार असल्याची माहिती एसपींनी दिली.