उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका लग्नसोहळ्यात नवरदेवाच्या अजब कृत्यामुळे मोठा गोंधळ उडाला. नशेत धुंद असलेल्या नवरदेवाने नवरीऐवजी तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मैत्रिणीला हार घातला. यामुळे वधूने संतापून नवरदेवाला सर्वांसमोर थप्पड मारली आणि लग्नास नकार दिला. यानंतर वधू-वर पक्षांमध्ये मोठा वाद निर्माण होऊन बेदम हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेव रवींद्र कुमार (२६) आपल्या लग्नाच्या दिवशीच मद्यधुंद होता. लग्नाच्या आधी त्याने मित्रांसोबत मोठ्या प्रमाणात मद्यपान केले होते. त्यामुळे तो लग्नाच्या मंडपात पोहोचताच विचित्र वागू लागला. लग्नाच्या विधी सुरू असताना तो स्टेजवर चढला आणि चुकून नवरीऐवजी तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मैत्रिणीला हार घातला.
नवरदेवाच्या या वागण्यामुळे संतप्त झालेल्या नवरीने त्याला सर्वांसमोर थप्पड मारली आणि त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. नवरीच्या या निर्णयानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद सुरू झाला. पाहता पाहता लग्नमंडपात खुर्च्या फेकल्या जाऊ लागल्या आणि जोरदार मारामारी झाली.
वधूच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, वरपक्षाने आधीच अडीच लाख रुपये घेतले होते आणि लग्नाच्या दिवशी आणखी दोन लाख रुपये मागितले. एवढे असूनही नवरदेवाने अपमानास्पद वर्तन केले. तसेच, तो आधीपासूनच दुसऱ्या मुलीशी लग्न करू इच्छित होता, त्यामुळे मुद्दाम वधूपक्षाचा अपमान केला, असा आरोप वधूच्या कुटुंबाने केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गोंधळ शांत केला. लग्न सोहळ्यात झालेल्या या गोंधळामुळे पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या काही मित्रांना ताब्यात घेतले. हुंडा मागणी प्रकरणी आणि वधूपक्षाचा अपमान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.