---Advertisement---
St Aloysius High School Case : भुसावळ शहरातील सेंट अलॉयसियस हायस्कूलमधील स्काऊट व गाईड युनिटच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट धार्मिक स्थळांना नेल्याच्या गंभीर आरोपांमुळे शाळेच्या मुख्याध्यापकासह आठ शिक्षकांवर कडक कारवाईचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत, तर यांच्या निलंबनाबाबत निर्णय घ्यावा, असे शिक्षण विभागाने संस्थाध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, याआधी भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे यांनी तक्रार केली व त्यांच्या नेतृत्वात सर्व पक्षांनी मोर्चा काढून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेतली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे, तर हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
कोणावर कारवाई?
मुख्याध्यापिका शिला सायमन, शिक्षक अमोल वसंत दांदळे, इरफान मुस्ताक शेख, बनार्ड एस मॉरिस, शिक्षिका मिशेल इ. फर्नांडिस, शिक्षण विभागाची मान्यता नसलेल्या शिक्षिका आफशीन खान व कौलीन कौर नेब यांच्यावर सेवेतून कमी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. खाजगी संगणक शिक्षक गुरुजीतसिंग पदम यांच्या नेमणुकीबाबत कोणतेही अधिकृत दस्तऐवज नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही संस्थेला देण्यात आले आहेत.
कारवाईसाठी सात दिवसांची मुदत
शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधित शिक्षकांवर केलेल्या कारवाईचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश शाळा प्रशासनास देण्यात आले आहेत. या प्रकरणावर शाळा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.
---Advertisement---