History of India: ओझे इतिहासाचे ! इतिहासाचे अवजड ओझे…डोक्यावर घेऊन ना नाचा,करा पदस्थल त्याचे आणिक…वरती चढूनी भविष्य वाचा
‘आपला इतिहास प्रमाणभूत मानून त्यावरच आपली उद्दिष्ट्ये ठरवत राहणे हे राष्ट्र आणि संस्कृतीच्या जीवनप्रवाहात शक्य नसते. कारण, अशी उद्दिष्ट्ये ही काळाच्या कसोटीवर पुरेशी महत्त्वाकांक्षी असूच शकत नाहीत.
आशयाचे एक वाक्य, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या ‘इंडिया वे’ या पुस्तकाच्या त्यांनीच लिहिलेल्या प्रस्तावनेत आले आहे. आपण भारतीय जेव्हा जेव्हा हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू इतिहास यांचा विचार करतो, तेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टींचा एक दुराभिमान मिरविण्यात धन्यता मानताना दिसतो.खरं म्हणजे नुकतेच संभाजी भिडे गुरुजींनी, एका पुस्तकाच्या आधारे केलेले वक्तव्य आणि त्यावर समाजमाध्यमे व राजकीय आघाडीवर चाललेला गोंधळ हे या डोक्यावरच्या ओझ्याचे उत्तम उदाहरण आहे.
म्हणजे विंदा करंदीकर म्हणतात तसे एक ओझेच फक्त आम्ही डोक्यावर घेत असतो. त्या इतिहासाचा, अनुभवाचा भविष्यगामी वापर करण्यात आम्ही कमी पडतो. हिंदू समाज प्रवाही नक्कीच आहे, परंतु प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात तो कमी पडतो किंवा परिस्थितीला भिडण्यात कमी पडतो, असा निष्कर्ष काढण्यास जागा आहे.
या सामाजिक मनस्थितीला अनेक कारणे असली, तरी त्यातील तीन कारणांचा विशेषत्वाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. यातील पहिले कारण म्हणजे भारतीय इतिहासाचे साम्यवाद्यांनी केलेले विकृत चित्रण आणि त्याचवेळी इतिहास समाजापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची चुकीची पद्धत होय. तर, दुसरे कारण म्हणजे समाजाच्या परिस्थितीशी लढण्याच्या इच्छाशक्तीचे केलेले निर्दालन होय.
तसेच तिसरे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे वसाहतवादी कालखंड आणि त्याची सामाजिक जडणघडणीतून स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर आकारण्यात आलेली आपली एक देश म्हणून भारताची प्रतिमा आणि यातूनच आकारले आमचे इतर देशांशी आलेले संबंध. या कारणांपैकी पहिले कारण म्हणजे भारतीय दृष्टिकोनातून इतिहासाकडे न पाहता पाश्चात्त्य दृष्टिकोनातून भारतीय इतिहासाची मांडणी व विश्लेषण होय. साम्यवादी मंडळींना असलेले इस्लाम प्रेम लपून राहिलेले नाही. त्यामुळेच शाळा-महाविद्यालयांतून शिकवल्या जाणा-या इतिहासात अकबर महान असतो.
औरंगजेब महत्त्वपूर्ण बादशहा असतो तर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे जेमतेम उल्लेख असतात तर लचित बडफुकन उल्लेख करण्याच्याही योग्यतेचा नसतो.छोटंसं का असेना, पण मोगलांच्या छाताडावर, औरंगजेबाच्या नाकाखाली हिंदूंचे राज्य निर्माण करणारा छत्रसाल अनुल्लेखाने मारला जातो.रामचंद्र गुहा आणि रोमिला थापर मोठे इतिहासकार ठरतात तर आर. सी. मुजुमदार आणि सीताराम गोयल यांचा उजव्या विचारसरणीचे ठरवून विचारही केला जात नाही
तसेच अत्यंत कमी प्रज्ञा असलेली मंडळी सर्व साधारणपणे सर्वच शाळा-महाविद्यालयांतून इतिहास हा विषय शिकवताना दिसतात. या देशातील पक्षीय राजकारणाने समाजाची लढण्याची क्षमताच संपवून टाकली आहे. याला कारण ६०-७० वर्षे सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष आणि त्याचे नेतृत्व होय. सत्ता राखण्यासाठी या पक्षाने अनेक तडजोडी केल्या. जे मन, मेंदू आणि मनगट या तिन्हींचा वापरू शकत होते आणि त्याचा पुरस्कार करीत होते त्यांना अनुल्लेखाने टोळीबाजीचे राजकारण करीत संपवलं गेलं. त्याचा परिणाम म्हणजे राजकीय नेतृत्वाचा सामान्य माणसाशी असणारा संबंध संपुष्टात आला.
देशात सरळ सरळ राजकीय घराणी निर्माण झाली. ही घराणी पिढ्यान्पिढ्या फक्त राजकारण करीत आहेत. सातत्याने सत्तेच्या परिघात आहेत, असा एक वर्ग निर्माण झाला. दुसरा सामान्य नागरिकांचा वर्ग, जो हे, छलकपट समजू शकत होता, परंतु राजकारणात शिरण्याची जोखीम घेऊ शकत नव्हता, असा राजकीयदृष्ट्या निष्क्रिय होत गेलेला वर्ग निर्माण झाला. राजकीय घराण्यांनी एकमेकांना बरोबर घेत, प्रसंगी नातेसंबंध निर्माण करीत, एकमेकांसाठी उत्पन्नाचे व सत्तेचे नवे नवे स्रोत निर्माण केले आणि राखले.परिणामत: निष्क्रिय वर्ग अधिक कमजोर झाला.
राजकीय घराणी मात्र पुष्ट होत गेली. कोणत्याही सामाजिक वा राजकीय आंदोलनासाठी, कोणत्याही नेत्यासाठी (याला काही सन्माननीय अपवाद आहेत.) आज रस्त्यावर उतरण्याची सामान्य माणसाची तयारी राहिलेली नाही. कोणत्याही आंदोलनाला यशस्वीतेकडे नेण्यासाठी ज्या पाय-या असतात तसेच ते परिपक्व होण्यासाठी लागणारा कालावधी असतो, तेवढा काळ कळ सोसण्याची मानसिकता हिंदू समाज गमावून बसलेला दिसतो. वसाहतवादी मानसिकतेतून, सत्ताधा-यांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांनी आमच्या मनात स्वतःचा देश म्हणून एक प्रतिमा निर्माण झाली. History of India तशीच आमची एक प्रतिमा जगभरातील इतर देशांमध्ये निर्माण झाली.
ही बाह्य प्रतिमा आमच्या अंतर्गत प्रतिमेतून आकाराला येणा-या सामाजिक वर्तनाचा परिपाक होता आणि आहे. दुर्दैवाने ही प्रतिमा अगदी सुरुवातीच्या काळात नेहरूंच्या नेतृत्वाखाली राष्ट्र म्हणून घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे तयार झाली. काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्र संघाकडे नेऊन एकतर्फी युद्धबंदी जाहीर करणे, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व स्वतः स्वीकारण्याऐवजी चीनचे नाव पुढे करणे, लियाकत अली-नेहरू करार जो पाकिस्तानने कधीच पाळला नाही; भारताने मात्र कधी उल्लंघन केला नाही. ही अशा घेतल्या गेलेल्या काही निर्णयांची उदाहरणे आहेत.असे अनेक निर्णय या देशात तेव्हा घेतले गेले ज्यामुळे सामान्य माणसाला आपण व्यक्ती आणि समाज म्हणून महत्त्वाकांक्षी होणे, एखादी जबाबदारी घेणे अनावश्यक वाटू लागले. पाकव्याप्त काश्मीर हा आमचा प्रदेश आहे, हे १९४८ ला आम्ही जगाला सांगत होतो, आजही सांगतो आहोत.
मागील ७५ वर्षांत काही फरक पडलाच असेल तर ३७० आणि ३५ ‘अ’ कलम फक्त आम्ही काढून टाकले, तेही कागदोपत्री. प्रत्यक्षात अजून तरी परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. हिंदूंनी इतर देशांच्या प्रदेशावर कधीच आक्रमण केले नाही, हे वारंवार सांगितले जाते. आमच्यापासून सांस्कृतिकदृष्ट्या तोडले गेलेले समाज अन् राजकीयदृष्ट्या तुटलेले प्रदेश, आजही आम्ही मनाला समजावत थंडपणे बघत राहतो. दुसरीकडे आम्ही अखंड भारताचे स्वप्न बघतो आहोत, अशा वल्गना करतो. याला कारण आम्ही इतिहासापासून काहीही शिकत नाही. आमच्याच मनातली आमची ती दीनवाणी प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत नाही. अल्पसंतुष्ट असलेलं आमचं समाजमन मग हटवलेले ३७० कलम आणि पूर्ण होणारे राम मंदिर यांच्या सुखद स्वप्नात गुंगून जातं. ही हिंदू समाजमनाची अल्पसंतुष्टता आधी झुगारून दिली पाहिजे. आमच्या मनातली आमची प्रतिमा सकारात्मक केली पाहिजे.
आम्ही कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो.कोणत्याही राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय शक्तींना नमवू शकतो, हा विश्वास हिंदूंनी आपल्या मनात रुजवला पाहिजे. आमच्या पूर्वजांचे स्मरण, आमचा इतिहास यांच्या जाणिवेनं राष्ट्रीय आणि सामाजिक महत्त्वाकांक्षा अधिक उजागर होण्याची वेळ आलेली आहे. २०१४ नंतर या देशात जे सकारात्मक बदल झाले ते, आमच्या मनातली व जगाच्या मनातली आमची प्रतिमा उंचावणारे आहेत, हा विश्वास मनात जागवला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात हा देश, हा हिंदू समाज आज देदीप्यमान कामगिरी करताना दिसत आहे, हे आमचा मानभंग करणा-यांना खडसावून बजावले पाहिजे. हिंदू समाजाने आज समान नागरी कायद्याच्या पलीकडे जात वक्फ बोर्ड व मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड खारीज करण्याची मागणी लावून धरली पाहिजे.
एन. आर. सी.च्या अंमलबजावणीसाठी दबाव बनवला पाहिजे. आमच्या देशाच्या पूर्व आणि पश्चिमेला असलेल्या भूभागावर दावा ठोकला तर पाकव्याप्त काश्मीर आपोआपच आम्हाला मिळणार आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. हे सगळे करणे म्हणजे एखाद्या पिढीने इतिहास घडवणे होय. आमच्या समाजाची नवी, अधिक सकारात्मक, अधिक बलवान अशी प्रतिमा साकार करण्याइतके महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट दुसरे कोणते असू शकते बरे?