---Advertisement---
तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या उकलापाडा (चापडी) येथील रहिवासी अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावातील नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात चार महिने गावाचा संपर्क तुटतो. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, जीव धोक्यात घालून विद्यार्थी नदी ओलांडत आहेत.
इतर कामे मागे-पुढे करता येतात, पण शिक्षण हे जीवन-मरणाचा प्रश्न आहे. गावातील नागरिकांना कुठल्याही शासकीय अथवा खाजगी कामानिमित्त मुख्यालयाच्या ठिकाणी जायचे असेल तर त्यांना नदी ओलांडण्या वाचून पर्याय नाही. त्यामुळे साहजिकच त्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ गेल्या दहा वर्षांपासून प्रशासनाकडे लोखंडी पुलाची मागणी करत आहेत. गावातील दिलीप तडवी, सानूबाई तडवी, शामसिंग नाईक यांच्यासह अनेक नागरिकांनी ग्रामपंचायत कुकडीपादरकडे लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात, नदीवर लोखंडी पूल बांधण्यासोबतच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी एका हातपंपाचीही मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाची उदासीनता, ग्रामस्थ संतप्त
अनेक वर्षांपासून मागणी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे येथील नागरिकांना आजही जीवनावश्यक गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर पूल आणि पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.