Nandurbar News : शस्त्र प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना आधुनिक पोलिसांची ओळख

नवापूर : लहान मुलांना पोलिसांपेक्षा त्यांच्याकडील शस्त्रांस्त्रांचे आकर्षण अधिक असते. त्यामुळे ‘पोलीस रायझिंग डे’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नवापूर पोलीस ठाणे मार्फत आज मंगळवारी शस्त्र प्रदर्शनासह आधुनिक पोलिसिंगची ओळख येथील प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. हे सर्व पाहून विद्यार्थी आनंदाने भारावले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांची आधुनिक शस्त्रे , एके-47, हॅण्ड ग्रेनेड, गॅस गन, बारा बोर, इत्यादी शस्त्रांचे प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना परिचय करून दिले. तसेच आपल्या मनोगतनातून विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न करा, असा संदेश दिला.

पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे दैनिक कामकाज, विविध विभागांची माहिती, सायबर गुन्हेगारीबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक माहिती दिली. पोलीस खात्याच्या या उपक्रमामुळे मुलांची पोलीसांबद्दलची भीती कमी होऊन त्यांच्या परिश्रमिक कार्याची जाणीव झाली.

या प्रसंगी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, शाळेचे प्राचार्य मिलिंद वाघ क्रीडा शिक्षक नरेश जयस्वाल, निलेश पाटील, निलेश कुवर, मृणालीनी सोमवंशी, प्रतिभा पवार, वंदना पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र अहिरे यांनी केले तर आभार विवेक वाडीले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक नारायण मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.