जळगावातील डॉ.आचार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली ‘संत शिकवण’

जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयाच्या प्राथमिक विभागात वर्षभर ज्या एकादशी साजऱ्या झाल्या त्याचा समारोप म्हणून शुक्रवार रोजी आमलकी एकादशीला ‘संतमेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळेतील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी विठ्ठल रुख्मिनीच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून ह. भ.प.दादा महाराज जोशी, महापौर जयश्री महाजन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, रामानंद पोलीस स्टेशनचे ए.पी.आय रोहिदास गभाले, शालेय समिती प्रमुख हेमाताई अमळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी हे होते.

संतमेळाव्यात किर्तन, भारुड, अभंगवाणी, पावली व दिंडीने भक्तिभाव निर्माण केला, संतांच्या जीवनावर आधारित प्रसंग, पथनाट्यातुन विद्यार्थ्यांनी विविध संतांचा जीवनपट उलगडला. संतांच्या गोष्टींची हस्तलिखितातून ओळख झाली, विद्यार्थ्यांनी काढलेले चित्रांचे चित्रकला प्रदर्शन लक्ष वेधून घेत होते, संतांची डॉक्युमेंट्रीतुन वर्षभराचा एकादशीचा आढावा सांगितला, या सोबतच संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, सावता माळी, सेना महाराज, चोखामेळा, नरहरी सोनार ,मुक्ताबाई,सखुबाई, पुंडलिक,निवृत्तीनाथ, एकनाथ, या संतांची पात्र विद्यार्थ्यांनी वेशभूषे सह साकारली व अभंग, ओव्याचे सादरीकरण केले.

संतमेळाव्याचे खास आकर्षण म्हणजे पंढरपूर येथील साकारण्यात आलेले विठ्ठलाचे मंदिर (संत नामदेव महाद्वार), नामदेव पायरी, गरूडखांब , संत चोखामेळा समाधी, ज्ञानेश्वर, मुक्ता इ ची ताटी, जनाबाईचे घर, संत गोरा कुंभाराची झोपडी साकारण्यात आली होती. परिसर शेणाने सारवण्यात आला होता. पालकांना व विद्यार्थ्यांना संत काळातील ग्रामीण सृष्टी अनुभवयास आली. कान्होपात्रा विठ्ठल भेट,सखुबाई विठ्ठल दर्शन,पुंडलिक विटेचा प्रसंग,एकनाथ जनार्दन स्वामी प्रसंग,सावता माळी विठ्ठल भेट,ज्ञानेश्वर ताटी प्रसंग व रेड्याच्या प्रसंग विद्यार्थ्यांनी खुमाकदार पध्द्तीने सादर केला. तसेच वृखवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगावर किर्तन विद्यार्थ्यांनी केले, प्रबोधनात्मक भारुड सादर करण्यात आले, बुरगुंडा होईल बये ग बुरगुंडा होईल. तुकारामांचे अभंग सुमधुर आवाजात सादर केले तसेच विद्यार्थ्यांना विक्री कौशल्य यावे म्हणून मेळाव्यात प्रसादाची व फुलांची विक्री विद्यार्थ्यांनी केली. या उपक्रमास पालकांनी प्रतिसाद दिला. कार्यक्रम यश्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संतमेळाव्याचा उद्देश काय?
विद्यार्थ्यांना संतसाहित्य माहीत व्हावे, संतांची ओळख, परिचय व्हावा, संतांच्या ओव्या, अभंगातून जीवनमूल्ये समजावी, इतरांबद्दल आदर, स्नेहभाव, सहकार्य, नम्रता निर्माण होणे, वाचन, गायन, लेखन, वक्तृत्व यातून गुणांचा विकास होणे हा या संतमेळाव्याचा उद्देश.