Viral Video : उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मालगाडी जात असल्याने रेल्वे फाटक बंद होता, मात्र एका विद्यार्थिनीने घाईगडबडीत फाटकाखालून रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. काही सेकंदांचा उशीर तिच्यासाठी जीवघेणा ठरला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
ही घटना मालीपूर रेल्वे स्थानकाजवळ घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की, रेल्वे फाटक बंद असल्याने अनेक वाहने थांबलेली होती. मात्र, एक विद्यार्थिनी धाडस करून फाटकाखालून वाकत रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करते. ती रुळ ओलांडत असताना काही सेकंदांचा उशीर होतो आणि त्याचवेळी वेगाने धावणाऱ्या मालगाडीने तिला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, तिचा जागीच मृत्यू झाला.
https://x.com/i/status/1883911362264629605
दुर्घटनेमागे आत्महत्येचा संशय?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी दु:ख आणि शोक व्यक्त केला. मात्र, काही नेटकऱ्यांनी यावर प्रश्न उपस्थित करत ही दुर्घटना नसून आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काहींनी निरीक्षण नोंदवले की, मुलीने मालगाडी येत असतानाही मागे हटण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे ती जाणूनबुजून थांबली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रशासन वारंवार आवाहन करत असते की, रुळ ओलांडणे अत्यंत धोकादायक आहे. असे असतानाही अनेक प्रवासी आणि स्थानिक नागरिक जीव धोक्यात घालून रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. ही घटना अशा बेपर्वा वर्तनाचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात, याचा उदाहरण देणारी आहे. स्थानिक पोलिस आणि रेल्वे प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
रेल्वे क्रॉसिंग नियमांचे पालन करा – प्रशासनाचा पुनरुच्चार
रेल्वे प्रशासन आणि पोलिस नागरिकांना सतत आवाहन करतात की, अधिकृत मार्गानेच रेल्वे क्रॉसिंग करावे आणि कोणत्याही परिस्थितीत रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. मात्र, अनेकदा दुर्लक्षामुळे जीवघेण्या घटना घडतात. या दोन दुर्घटनांमधून नागरिकांनी बोध घ्यावा आणि आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.