नवी दिल्ली : कार्यशाळेच्या बहाण्याने विद्यार्थ्यांना मशिदीत नेणाऱ्या गोव्यातील एका खासगी शाळेच्या प्राचार्याला निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मशिदीत नमाज पठण करायला लावल्याचा आणि इतर इस्लामिक कृत्ये करायला लावल्याचा आरोप प्राचार्यावर आहे. मशिदीतील कार्यक्रमामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घातलेल्या कट्टरतावादी संघटनेचा हात असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेवर राज्याच्या शिक्षण विभागानेही शाळा व्यवस्थापनाकडून उत्तर मागितले आहे.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गोव्यातील वास्को शहरातील आहे. दि. ११ सप्टेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेने (VHP) येथील केशव स्मृती उच्च माध्यमिक या खाजगी शाळेचे प्राचार्य शंकर गावकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, दि. ९ सप्टेंबर रोजी शंकर गावकर शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन दाबोळीन येथील नूर मशिदीत गेले होते. तिथे एका इस्लामिक संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नमाज पठण करायला लावले जात होते . तसेच विद्यार्थिनींवर हिजाब घालण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. मात्र विद्यार्थिनींनी त्यास नकार दिला.
तक्रारीनुसार, मशिदीत झालेल्या कार्यक्रमात अनेक मौलानांनी भाषणे दिली होती. कार्यक्रमासाठी आलेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ असल्याचे सांगण्यात येत आहे. मशिदीत झालेल्या या कार्यक्रमात केशवस्मृती शाळेव्यतिरिक्त सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचीही उपस्थिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ‘मस्जिद ओपन फॉर ऑल’ असे नाव देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक पीएफआयशी संबंधित संघटना असल्याचे सांगत हिंदू संघटनांनी प्राचार्य शंकर गावकर यांच्यावर देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
ही बाब उघडकीस आल्यानंतर शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेश झिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत शाळा व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण मागवले आहे. शाळेचे व्यवस्थापकीय अध्यक्ष पांडुरंग कोरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचार्य शंकर गावकर यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी हिंदू संघटनांचीही माफी मागितली असून शाळेची मानसिकता चुकीची नसल्याचे म्हटले आहे. निलंबित प्राचार्य शंकर गावकर यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सांप्रदायिक सलोखा वाढवण्याच्या उद्देशाने उचललेले हे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (SIO) शी संलग्न जमात-ए-इस्लामी हिंदने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या संघटनेचे गोवा अध्यक्ष आसिफ हुसेन यांनी सांगितले की, नूर मशीद येथे आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थी स्वेच्छेने येतात. आसिफच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना मशिदीचा तो भाग दाखवण्यात आला जिथे नमाज अदा केली जाते. मुलांना मिठाई दिल्याची कबुली देताना आसिफ म्हणाले की, इस्लामिक नियमांचे पालन करण्यास कोणीतरी भाग पाडण्याचे आरोप निराधार आहेत.